पणजी- उत्तर गोवा जिल्ह्यातील फोंडा तालुक्यातील निरंकाल भागात गेल्या तीन-चार महिन्यांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे.
रात्रीच्यावेळी लोकवस्तीत घुसून हा बिबट्या पाळीव कुत्र्यांची शिकार करत असल्याने परिसरात घबराट पसरली आहे.गवळवाडा, शिगणेव्हाळ,मायणे,कोनसे,सातेरीमळ व अन्य भागातही या बिबट्याचा संचार असून वन खात्याने त्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा,अशी मागणी स्थानिक लोक करत आहेत.
गेल्या चार दिवसांपूर्वी तर या बिबट्याने भरदिवसा रुक्मिणी प्रभू यांच्या घरासमोरच बिबट्याने हजेरी लावली होती. काही दिवसांपूर्वी पास्कॉल रॉड्रिग्ज यांच्या पाळीव कुत्र्यांची शिकार या बिबट्याने केली होती. याबाबत वनखात्याला कळविल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी काही दिवस रात्रभर पहारा दिला होता. पण आता हा बिबट्या लोकवस्तीत फिरत असल्याचे दिसून येत आहे. तरी वनखात्याने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी,अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.