पॅरिस – पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्याच्या काही तास आधी फ्रान्समधील सरकारी मालकीच्या अतिजलद रेल्वेवर दहशतवादी हल्ला झाला. हल्लेखोरांनी हायस्पीड रेल्वेच्या स्थानकांवर जाळपोळ व मोडतोड केली. याचा फटका 8 लाखांहून अधिक प्रवाशांना बसला. ऑलिम्पिकच्या निमित्ताने फ्रान्समध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. त्यात पॅरिस ऑलिम्पिकला दहशतवादी हल्ल्याचा धोक्याचा इशारा आधीच दिला होता. त्यामुळे पोलीस यंत्रणा सज्ज होती. तरीही हा दहशतवादी हल्ला झाल्याने ऑलिम्पिकवर धमक्यांचे सावट आले आहे.
पॅरिसमध्ये सीन नदीच्या काठी ऑलिम्पिकचा शानदार सोहळा आयोजित करण्यात आला असतानाच या हल्ल्यांमुळे फ्रान्सच्या विविध शहरांतून पॅरिसकडे येणार्या व पॅरिसहून विविध शहरांत जाणार्या अतिजलद रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. यामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द कराव्या लागल्या. काही गाड्या परत पाठवाव्या लागल्या. फ्रान्सच्या लिले,
बोर्डोक्स आणि स्ट्रासबर्ग या रेल्वे स्थानकांवर काही गटांनी नियोजित पद्धतीने जाळपोळ केली. त्यांनी रेल्वेच्या केबल जाळल्या. रेल्वे स्थानकांवरील विविध फलकांची व इतर सामानांची मोडतोड केली. पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही नासधूस करण्यात आली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. फ्रान्स रेल्वेने प्रवाशांना आपला प्रवास पुढे ढकलण्याचे आवाहन केले आहे. या प्रकारांमुळे अनेक स्थानकांवरून पॅरिसच्या दिशेने निघालेल्या रेल्वेगाड्या आपल्या स्थानकांवर परत बोलावण्यात आल्या. त्यामुळे जागोजागी प्रवासी अडकून पडले. या घटनेचा परिणाम लंडन आणि फ्रान्सला जोडणार्या हायस्पीड रेल्वे सेवेवरदेखील झाला आहे. ही रेल्वे सेवा रद्द करण्यात आली आहे. रेल्वेच्या दुरुस्तीचे काम चालू असून, शनिवार व रविवारीही वाहतूक विस्कळीत असेल, अशी शक्यता आहे.
फ्रान्समध्ये पॅरिस ऑलिम्पिकच्या सुरक्षेसाठी सध्या 45 हजार पोलीस अधिकारी, 10 हजार लष्करी जवान आणि 2 हजार खासगी सुरक्षा कर्मचारी तैनात केलेले आहेत. फ्रान्समध्ये कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही हे प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी घेतलेली नाही. मात्र, पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या आधी रेल्वे सेवा विस्कळीत करण्याच्या हेतूने या गोष्टी केल्याचे बोलले जात आहे. एसएनसीएफ या सरकारी रेल्वे कंपनीने असे निवेदन केले की, हे हल्ले नियोजित पद्धतीने रेल्वे नेटवर्कमधील महत्त्वाच्या स्थानकांवर करण्यात आले आहेत. फ्रान्सचे क्रीडा अमेली ओडे कॅस्टेरा यांनी या भ्याड कृत्याचा निषेध केला आहे.