बच्चू कडूंना मैदान दिले! पैसे भरले! पावती दिली पण अमित शहा येणार म्हणताच पोलिसांनी कडूंना हाकलले

अमरावती – अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांच्यासह सर्वचजण एकवटले आहेत. यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व आले आहे. 26 एप्रिल रोजी येथे मतदान असून उद्या प्रचाराचा अखेरचा दिवस आहे. उद्या येथील सायन्स कोर मैदानात बच्चू कडू यांची महत्त्वपूर्ण सभा होणार होती. त्यासाठी त्यांना रितसर परवानगीही देण्यात आली होती. मात्र अमित शहा यांना उद्या याच मैदानावर सभा घ्यायची असल्याने पोलिसांनी सरळ कायदा धाब्यावर बसवून बच्चू कडू यांना मैदानातून हाकलून दिले. यामुळे संतापाची लाट उसळली आहे.
अमरावतीच्या सायन्स कोर मैदानात 20 आणि 21 एप्रिल असे दोन दिवस भाजपाने सभेसाठी परवानगी घेतली होती. ही परवानगी त्यांना पोलिसांकडून देण्यात आली होती. त्यानंतर 23 व 24 एप्रिल असे दोन दिवस याच मैदानावर सभा घेण्याची परवानगी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना त्याच पोलिसांनी दिली. या परवानगीसाठी 5, 7, 12 एप्रिल अशा तीन दिवशी बच्चू कडू यांनी रितसर अर्ज केला होता. 18 एप्रिल रोजी त्यांना या मैदानावर सभा घेण्याची परवानगी देण्यात आली. त्यासाठी आवश्यक ती रक्कम बच्चू कडू यांनी भरल्यानंतर त्यांना 23 व 24 एप्रिल असे दोन दिवस मैदान त्यांच्यासाठी आरक्षित असल्याची रितसर पावती देण्यात आली. मात्र त्यानंतर धक्कादायक घटना घडल्या. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे नेते अमित शहा यांना अमरावतीत याच मैदानावर 24 एप्रिललाच सभा घेण्यास वेळ होता. हे ठरल्यानंतर पोलिसांनी सरळ बच्चू कडू यांना परवानगी नाकारली. आज 24 एप्रिलच्या सभेच्या तयारीसाठी बच्चू कडू हे आपल्या कार्यकर्त्यांसह मैदानात हजर झाले तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांनी या सर्वांना अडवले आणि मैदान सोडून जाण्यास सांगितले. बच्चू कडू यांनी परवानगीची पावती दाखवल्यानंतरही काही फरक पडला नाही. त्यातच अमित शहा आणि भाजपा यांच्याकडून 24 एप्रिलच्या सभेसाठी कोणतीही लेखी परवानगी घेण्यात आलेली नाही. पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांच्याकडे अमित शहांना सभेसाठी परवानगी दिल्याचे लेखी कागदपत्र मागितल्यावर ते कोणतेही कागदपत्र देऊ शकले नाहीत, असे असूनही ज्याला रितसर परवानगी देण्यात आली होती त्या बच्चू कडू यांना मैदानातून हाकलवून देऊन त्या मैदानावर भाजपाच्या उद्याच्या सभेसाठी 35 हजार लोकांना बसता येईल असा भव्य मंडप उभारण्याचे काम बिनधास्तपणे सुरू होते. विशेष म्हणजे बच्चू कडू यांच्यावर कारवाई केल्यानंतर अचानक जोराचा वारा सुटला आणि भाजपाच्या सभेसाठी उभारलेला मंडप खाली कोसळला. हनुमानानेच अद्दल घडवली अशी चर्चा यानंतर अमरावतीत सुरू झाली.
बच्चू कडू आणि कार्यकर्त्यांना मैदानात रोखल्यानंतर पोलीस अधिकारी गणेश शिंदे हे म्हणत होते की, सुरक्षेच्या प्रश्‍नामुळे तुम्हाला उद्या सभा येथे घेता येणार नाही. हे मैदान अमित शहा यांच्या सभेसाठी दिलेले आहे. ते गृहमंत्री असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घ्यावी लागते. दोन दिवस आधी मैदान मोकळे ठेवून तपासणी करावी लागते. त्यांच्यासाठी वेगळे नियम आहेत. त्यांची सभा ठरल्याचे आम्हाला सांगण्यात आले. यावर बच्चू कडू यांनी उसळून सवाल केला की, तुम्ही जर कोणतीही परवानगी न घेता भाजपाला ही सभा घेऊ देता आहात तर मग परवानगीचे टेबल ठेवले कशाला? आम्हाला परवानगीची रिसीट कशासाठी दिली? तुम्ही आम्हाला समजावून सांगत आहात. खरे तर आमच्याकडे परवानगी असल्याने तुम्ही त्यांना समजावून सांगायला हवे. आता तुम्ही भाजपाचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहात. तुम्ही भाजपाचा दुपट्टा घाला. सुरक्षेचे कारण सांगून मला दिलेली परवानगी नाकारत तुम्ही कायदा कसा काय मोडता? त्यांना मैदान बदलायला का सांगितले नाही. ते जास्त महत्त्वाचे झाले आहेत. आम्हाला दिलेली परवानगी महत्त्वाची नाही. उद्या तुम्ही सुरक्षेचे कारण देऊन आमच्या घरातही घुसाल. आज तुम्ही कायदा मोडून तुमच्या वर्दीची बेईज्जती केली आहे. तुम्ही गुलाम झाले आहात. कायदा मोडून तुम्ही घटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे.
बच्चू कडू यांनी मैदानाच्या परवानगीची रितसर पावती वारंवार दाखवूनही काही परिणाम झाला नाही. त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मैदानाबाहेर काढण्यात आले आणि उद्या याच मैदानात कोणतीही परवानगी न घेता अमित शहा यांची जाहीर सभा
होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top