ढाका-हिंदी महासागरात चीनचा मोठा प्रभाव आहे. या पार्श्वभूमीवर भारताने चीनला मागे टाकून बांगला देशच्या मोंगला बंदराच्या व्यवस्थापनाची जबाबदारी मिळवली आहे. बांगला देशच्या पंतप्रधान शेख हसीना गेल्या महिन्यात भारत दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी हा करार करण्यात आला.या करारामुळे हिंदी महासागरात भारताने चीनवर कुरघोडी केल्याचे म्हटले जात आहे. चीनलाही या बंदराचे व्यवस्थापन हवे होते. मात्र बांगलादेशने भारतावर विश्वास दाखवला. चितगाव नंतर मोंगला हे बांगलादेशातील दुसरे मोठे बंदर असून त्याचे व्यवस्थापन भारत करणार आहे. भारताने या वर्षात म्यानमारमधील स्वेत आणि इराणच्या चाबहार बंदरांसाठी व्यवस्थापनाचे करार केले आहेत. बांगला देशातील मोंगला बंदर हे इंडिया पोर्टस ग्लोबल लिमिटेड ही कंपनी चालवणार आहे. जवाहरलाल नेहरु बंदर आणि कांडला बंदर व्यवस्थापन कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. जहाजांचे दळणवळण व कंटेनरच्या वाहतुकीसाठी मोंगला बंदर हे भारतासाठी फार महत्त्वाचे असून त्यामुळे भारताला ईशान्येकडील राज्यांशी संपर्क वाढण्यास तसेच चिकन नेक किंवा सिलीगुडी कॉरिडॉरवरील तणाव कमी होण्यात मदत होणार आहे. या बंदराच्या व्यवस्थापनामुळे चीनचा प्रभाव कमी करता येणार आहे. हिंदी महासागरात आपला प्रभाव वाढवण्यासाठी चीन जिबूतीमध्ये ६५२ कोटी रुपये आणि पाकिस्तानातील ग्वादरमध्ये १.३ लाख कोटी रुपयांची बंदरे बांधत आहे. कंटेनर वाहतुकीच्या बाबतीत असलेल्या पहिल्या दहा क्रमांकांच्या बंदरांमध्ये एकाही भारतीय बंदराचा समावेश नाही. तर चीनची ६ बंदरे या यादीत आहेत.