ढाका- बांगलादेशमध्ये अलीकडेच झालेल्या सत्ता परिवर्तनाचा परिणाम आता भारतावर होताना दिसू लागला आहे. बांगलादेशातील पद्म हिल्सा नावाच्या माशांना भारतात खाण्यासाठी खूप मागणी आहे. मात्र आता बांगलादेशाने या माशाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आगामी दुर्गापूजेवर त्याचा परिणाम दिसून येईल. कारण पश्चिम बंगालसह विविध राज्यात दुर्गापूजा काळात या हिल्सा माशांना मोठी मागणी असते.
गेल्यावर्षी बांगलादेशातून ४ हजार टन पद्म हिल्सा मासळी भारतात आयात झाली होती. हा तब्बल दोन हजार रुपये किलो दराने विकला जातो. ९ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत देशात दुर्गापूजा उत्सव होणार आहे. या काळात बंगालसह देशातील विविध राज्यांमध्ये हिल्सा माशांना मोठी मागणी असते. लोक हे मासे खिचडीसोबत मोठ्या आवडीने खातात. मात्र आता बांगलादेशच्या अंतरिम सरकारने त्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. इतर देशांत पाठवण्यापूर्वी ते देशवासीयांना खाण्यासाठी मिळावे, अशी सरकारची भूमिका आहे. हिल्सा हा बांगलादेशचा राष्ट्रीय मासा आहे. जगात उपलब्ध असलेल्या हिल्सापैकी ७० टक्के हिल्सा मासे बांगलादेशातून निर्यात होतात.