चेन्नई
रोखीच्या टंचाईचा सामना करत असलेली एडटेक कंपनी बायजूने पुन्हा एकदा आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराला विलंब केला आहे. सलग दुसऱ्या महिन्यात कर्मचाऱ्यांचे पगार थकवले आहेत. राईट इश्यूद्वारे उभारलेली रक्कम जारी करण्यासाठी सध्या एनसीएलटीकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे, ज्यामुळे बाजूला कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात अडचणी येत आहेत. मागील महिन्यातही बायजूचे संस्थापक आणि सीईओ बायजू रवींद्रन यांनी असाच युक्तिवाद केला होता.
कंपनीने काल आपल्या कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, ‘आम्हाला कळविण्यास अत्यंत खेद वाटतो की, तुमचा पगार मिळण्यास पुन्हा एकदा विलंब होणार आहे. आमचा भारताच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही आमच्या बाजूने निकाल येण्याची वाट पाहत आहोत. राईट इश्यूद्वारे उभारलेल्या पैशाचा वापर करून आम्ही रोखीच्या तुटवड्याचा सामना करू शकतो. आम्ही अन्य मार्गाने कर्ज घेण्याची तयारी करत आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमचा पगार ८ एप्रिलपर्यंत मिळू शकेल. राईट इश्यूवरून उभारलेल्या निधीवरून बंदी उठवल्यानंतर आम्ही पगाराशी संबंधित सर्व आश्वासने पूर्ण करू शकू.’