बारामती- शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि त्यांची नात रेवती सुळे यांना आज बारामती टेक्सटाइल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आले होते. या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आहेत. ही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत प्रतिभा पवार या सुरक्षारक्षकासोबत बोलतान दिसत आहेत. तुम्हाला गेट बंद करण्यास कुणी सांगितले? असे त्यांनी विचारल्यावर कंपनीचे सीईओ वाघ यांचा आम्हाला फोन आला होता, असे सुरक्षारक्षकाने सांगितले. आधी तर गेट सुरू होते, मग आमची गाडी दिसल्याबरोबर गेट का बंद केले? असेही त्यांनी विचारले. त्यावर मी तर केवळ सुरक्षारक्षक आहे, मला आतून फोन आल्याने मी गेट बंद केले, असे सुरक्षारक्षक म्हणाला. त्यानंतर प्रतिभा पवार संतापून म्हणाल्या की, आम्ही चोरी करण्यासाठी थोडीच आलो आहोत. आम्हाला खरेदी करायची आहे. मात्र आतमधून फोन आल्याने मी काहीही करू शकत नाही, असे सुरक्षारक्षकाने सांगितल्याने शेवटी प्रतिभा पवार या कारमध्ये जाऊन बसल्या. दरम्यान या घटनेची बारामतीमध्ये जोदार चर्चा होत आहे.