‘बिद्री’चे अध्यक्ष के पी पाटील यांनी मुंबईत अजित पवारांची भेट घेतली

मुंबई – बिद्री सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. या कारवाईच्या मागे एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा हात आहे,असा आरोप पाटील यांनी अजित पवार यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना केला.
आबिटकर यांच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते कारखाना बदनाम करत असून कारखान्याची दहा वेळा तपासणी करा काहीही फरक पडत नाही. असा दावा पाटील यांनी याप्रसंगी बोलताना केला.
कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री सहकारी साखर कारखाना राज्यात उसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून प्रसिद्ध आहे. या कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर हजेरी लावली होती. शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. ते येणारी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. त्यामुळेच आकसापोटी त्यांच्या कारखान्यावर कारवाई केली आहे का अशीही चर्चा होत आहे.