बिहारमध्ये ‘भाजपा’ चीतपट होणार? भाजपा आणि नितीशकुमारांचे आमदार लापता

पाटणा – भाजपाबरोबर नव्याने घरोबा केलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार उद्या बिहार विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. त्याआधी आज बिहारमधील सगळ्याच पक्षांत राजकीय हालचालींना नाट्यमय वेग आला. काल नितीशकुमारांच्या जदयू आमदारांसाठी आयोजित केलेल्या मेजवानीला 6 आमदार अनुपस्थित असतानाच आज त्यांचे मंत्री विजय चौधरी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीलाही पुन्हा काही आमदारांनी दांडी मारल्याने खळबळ उडाली. भाजपाचेही 3 आमदार नॉट रिचेबल आहेत. यामुळे नितीशकुमारांना बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी खेळी करणारा भाजपा उद्या चीतपटही होऊ शकतो.
बिहारमध्ये सध्या भाजपाप्रणित एनडीएकडे 128 आमदार आहेत. त्यात जदयूचे 45, भाजपचे 78, हिंदुस्तानी अवाम पार्टीचे 4, अपक्ष -1 आमदार आहेत. तर लालूप्रसाद प्रणित महागठबंधनमधील 115 आमदारांमध्ये राजद 79, काँग्रेस 19, डावे पक्ष 16 आणि एका अपक्षाचा समावेश आहे. बहुमताचा आकडा 123 आहे. त्यामुळे बहुमत सध्या एनडीएच्या बाजूने आहे. मात्र जदयूच्या 6 आमदारांनी आणि माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चाच्या 4 आमदारांनी उद्या बहुमत चाचणीवेळी अनुपस्थित राहून महागठबंधनला साथ दिल्यास एनडीएसमर्थक आमदारांची संख्या 118 म्हणजे बहुमताच्या 123 च्या आकड्यापेक्षा कमी होते. त्यामुळे नितीशकुमार विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी पराभूत होण्याची वेळ येऊ शकते. हे आमदार अनुपस्थित राहिले तरी नितीशकुमार यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही. विधानसभा अध्यक्ष अवध चौधरी हे लालूप्रसाद यादव यांच्या पक्षाचे असल्याने ते लगेच बहुमत नाही म्हणत नितीशकुमार भाजपा आघाडीला बाजूला सारून राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात किंवा लालूप्रसाद यादवना बहुमत सिद्ध करण्याची संधी देऊ शकतात. यासाठीच आता नितीशकुमार आणि भाजपा या अध्यक्षांविरुद्ध अविश्‍वास ठराव आणून त्यांना काढण्याच्या मागे लागले आहेत.
राजदचे तेजस्वी प्रसाद हे जीतनराम मांझी यांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. मांझी यांनी त्यांच्याकडे गया हा लोकसभा मतदारसंघ आणि एक महत्त्वाचे कॅबिनेट खाते मागितले आहे. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते, या प्रकारे राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता फार कमी आहे. कारण गया या लोकसभा मतदारसंघात सगळे आमदार भाजपचे असून तिथून मांझी निवडून येणे अवघड आहे. जदयूचे शालिनी मिश्रा यांना लालूप्रसाद यादव यांच्याबरोबर गेल्यास आपल्या मतदारसंघात निवडून येणे सोपे नसेल. विश्वासदर्शक ठरावाच्या आदल्या दिवशी आज बिहारमधील सगळेच पक्ष आपल्या आमदारांची एकजूट ठेवण्याचा प्रयत्न करत होते. जदयूचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सर्व आमदारांना पाटणामध्ये बोलावले. मात्र, काल जदयूचे मंत्री श्रवणकुमार यांनी आयोजित केलेल्या मेजवानीला बीमा भारती, सुदर्शन कुमार, शालिनी मिश्रा, दिलीप राय, डॉ. संजीवकुमार आणि गुंजेश्वर शहा या 6 आमदारांनी दांडी मारली. तर गोपाल मंडल जेवण संपल्यावर श्रवणकुमार यांच्या निवासस्थानी पोहोचले. आमदारांच्या अनुपस्थितीची वेगवेगळी कारणे सांगितली गेली. यातील शालिनी मिश्रा, दिलीप राय आणि संजीव सिंह हे पाटणा येथे उपस्थित नसल्याने मेजवानीला अनुपस्थित होते, असे सांगितले गेले. त्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार आमदारांवर काहीसे संतापले आणि तिथून निघून गेले. अनुपस्थित राहिलेल्या या आमदारांशी जदयूच्या वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधल्याचेही म्हटले जात आहे. दुसर्‍या बाजूला लालूप्रसाद यादव जदयूच्या आमदारांशी संपर्क साधत असल्याचेही वृत्त काल पसरले. त्यामुळे या आमदारांबाबत दिवसभर वेगवेगळ्या चर्चा ऐकायला येत होत्या. आज संध्याकाळी पाच वाजता जदयूच्या आमदारांची पुन्हा एकदा बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री नितीशकुमार पाच वाजताच हजर झाले. परंतु अनेक आमदार तोपर्यंत पोहोचलेही नव्हते. असे यापूर्वी घडले नव्हते. या बैठकीला 45 पैकी 41 आमदारच
उपस्थित होते. ही बैठक झाल्यावर विजय चौधरी म्हणाले की, 128 आमदार आमच्यासोबत आहेत, जे दोन-चार आमदार आज बैठकीला आले नव्हते. ते परवानगी घेऊनच गैरहजर राहिले होते. विजय चौधरी असे सांगत असले तरी अनुपस्थित 3 आमदारांचे फोन दिवसभर स्विच ऑफ होते.
भाजपाने आपल्या आमदारांना प्रशिक्षण शिबिराच्या नावाखाली गया येथे ठेवले होते. ते आज पाटणात परतले. उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या निवासस्थानी संध्याकाळी त्यांची बैठक पार पडली. परंतु आज भाजपाच्या तीन आमदारांचा संपर्क होत नव्हता. त्यामध्ये रश्मी वर्मा, भगीरथी देवी आणि मिश्रीलाल यादव यांचा समावेश होता. यातील रश्मी वर्मा यांच्या सासू आजारी असल्याचे सांगण्यात आले. मिश्रीलाल यादव यांची कुठलीही माहिती मिळाली नाही. तर भगीरथी देवी एक दिवस आधी आमदारांबरोबर होत्या. परंतु त्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाल्या नाहीत. त्यामुळे फो़डाफोडीच्या चर्चेलाआणखी बळ मिळाले. काँग्रेसने आपल्या आमदारांना बिहारमध्ये सत्तापालट झाल्यापासून हैदराबादला ठेवले होते. तेही आज खासगी विमानाने पाटणात परतले. राजद नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनीही राजदच्या आमदारांची आपल्या निवासस्थानी बैठक बोलावली आणि त्यानंतर सर्व आमदारांना तिथेच बंदिस्त ठेवण्यात आले. उद्या काय होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top