Home / News / बीकेसीतील सिग्नल फ्री मीसिंग लिंक रोड वाहतुकीसाठी खुला

बीकेसीतील सिग्नल फ्री मीसिंग लिंक रोड वाहतुकीसाठी खुला

मुंबई – बीकेसीतील एमटीएनएल जंक्शन ते एमएमआरडीए मैदान यादरम्यान उभारण्यात आलेला मीसिंग लिंक रोड आज पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. बीकेसीतील एमटीएनएल जंक्शन ते बीकेसी कनेक्टरदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी एमएमआरडीएने ४ कोटी रुपये खर्च करून मिठी नदीच्या किनाऱ्याला लागून मीसिंग लिंक रोडची उभारणी केली. हा रस्ता सिग्नल फ्री असणार आहे.

‘बीकेसी कनेक्टर’च्या खालून जाणारा हा नवा रस्ता वांद्रे कुर्ला संकुलातील जी ब्लॉकमधील भूखंड क्र. सी ७९ आणि सी ८० यांना जोडतो. हा रस्ता सुमारे २०० मीटर लांबीचा असून, १८ मीटर रुंदीचा आहे. त्यावर प्रत्येकी ३ मार्गिका आहेत. त्यातून या भागातील वाहनांना आणखी एक पर्यायी रस्ता उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या भागातून वाहनांना सिग्नल फ्री प्रवास करता येत आहे. तसेच त्याचबरोबर पूर्व द्रुतगती महामार्गापासून येणाऱ्या वाहनांच्या बीकेसीतील प्रवासाच्या वेळेत जवळपास १५ मिनिटांची बचत होणार आहे. हा रस्ता खुला झाल्याने बीकेसी कनेक्टरखालून आणखी एक नवा मार्ग वाहनांना उपलब्ध झाला आहे. तसेच सेबी कार्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना दिलासा मिळाला आहे.