मुंबई – शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार गटात सामील झालेले नवाब मलिक यांनी आज मानखुर्दमधून अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म सकट अर्ज दाखल केल्याची घोषणा केली. नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप असल्याने त्यांना उमेदवारी देऊ नका, अशी ठाम भूमिका भाजपाने जाहीरपणे घेतली आहे. भाजपाप्रमाणे एकनाथ शिंदे गटानेही तितक्याच ठामपणे नवाब मलिक यांना उमेदवारी देण्यास विरोध केला. मात्र आता भाजपा आणि शिंदे गटाच्या नावावर टिच्चून अजित पवार यांनी नवाब मलिक यांना अधिकृत उमेदवारी दिली. यावरून महायुतीत बेबनाव होण्याची शक्यता आहे.
भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, कोणत्याही दाऊद समर्थकाला उमेदवारी देता येणार नाही असे आम्ही जाहीरपणे सांगितले होते. त्यांना उमेदवारी दिली तरी भाजपाचा एकही व्यक्ती त्यांना मतदान करणार नाही. आज शिंदे गटाचे संजय शिरसाट हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, नवाब मलिकना उमेदवारी देऊ नका, असे आम्ही स्पष्ट सांगितले होते. तरीही त्यांनी उमेदवारी दिली आहे. तेव्हा आता एकनाथ शिंदे भूमिका घेतील. कदाचित जाहीरपणे यावर बोलतील. नवाब मलिक यांना विधानसभा उमेदवारी अर्ज देण्याबाबत महायुतीचा विरोध होता. त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढणार होते. आज ते शक्तिप्रदर्शन करीत अर्ज भरायला गेले तेव्हा त्यांच्याकडे एबी फॉर्म नव्हता. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज तयार ठेवला होता. मात्र अखेरच्या 5 मिनिटांत नवाब मलिक यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अधिकृत उमेदवारीचा एबी फॉर्म देण्यात आला. अर्ज भरल्यावर ते म्हणाले की, मी अजित पवार गटाचा अधिकृत उमेदवार आहे. माझ्या विरोधात जे सुरू आहे ते राजकारण आहे. माझ्या मुलीच्या विरोधात भाजपाने उमेदवार दिला आहे. यानंतर शिंदे व भाजपा राजकीय फायदा पाहून चुप्प बसतात की विरोधात भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना तुरुंगात जावे लागले होते. मलिक जामिनावर तुरुंगाबाहेर आले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले. अजित पवारांच्या पक्षातील त्यांच्या सहभागावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले होते. विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीत मत कमी पडेल असे वाटले तेव्हा महायुतीने नवाब मलिक यांचे मत स्वीकारले होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या मतदानाला विरोध केला नाही. नवाब मलिक हे अजित पवारांच्या पक्षाचा मुंबईतील मुस्लीम चेहरा आहेत. त्यामुळे त्यांना शिवाजीनगर-मानखुर्द तर त्यांची मुलगी सना मलिक यांना अणूशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिली आहे.
