सोनीपत- हरियाणातील भाजपा सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे, असा घणाघात काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज केला. ते हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी सोनीपत इथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका केली.
राहुल गांधी म्हणाले की, हरियाणातील लोक सध्या बेरोजगारी व महागाई यांच्या कात्रीत सापडलेले आहेत. त्यात ड्रगचा विळखाही वाढत चालला आहे. त्यावर मोदी काहीच बोलत नाहीत. अदानी यांच्या मुंद्रा बंदरात सापडलेल्या हजारो कोटींच्या ड्रग प्रकरणात सरकारने काय कारवाई केली? किती जणांना अटक केली, याची माहिती मोदींनी द्यावी. सरकार शेतीला भाव देत नाही. तरुणांना नोकरी देत नाही. राज्यात २ लाख सरकारी नोकऱ्या रिक्त आहेत. त्या भरल्या गेलेल्या नाहीत. हरियाणातील युवक मोठ्या प्रमाणात सैन्यात जातो. अग्निवीर योजनेद्वारे त्याचा तोही मार्ग बंद करण्यात आला आहे. अग्निवीर योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारला सैनिकांची पेन्शन, कँटीन सुविधा व शहीदाचा दर्जा संपवायचा आहे. त्यांना संरक्षण विभागाचा सगळा निधी अदानींना द्यायचा आहे. अदानी डिफेन्सच्या माध्यमातून परदेशी शस्त्रे विकत घेण्याचा सौदा करायचा आहे. अदानी एकही शस्त्राची निर्मिती करत नाही, तरीही त्यांचा फायदा करून देण्यासाठी हे सारे चालले आहे.
मोदींनी देशातील मोठ्या उद्योगपतींची १६ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली. आम्ही गरिबांची ती रक्कम माफ करणार. त्यांनी शेतकऱ्यांची, विद्यार्थ्यांची कर्जे माफ केली नाहीत. हरियाणात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांना दरमहा २१०० रुपये देणार. युवकांना सरकारी नोकऱ्या देणार. शेतकऱ्यांच्या मालाला किमान आधारभूत किंमत देणार. अन्याय्य करआकारणी रद्द करणार. देशाचे राजकारण द्वेषावर चालू शकत नाही. ते केवळ प्रेमावर चालते. ही लढाई संविधान वाचवणाऱ्या काँग्रेस व संविधान नष्ट करणाऱ्या भाजपाच्या विरोधात आहे.