भारताच्या सर्वात मोठ्या हवाई सरावात १० देशांची लढाऊ विमाने भाग घेणार

नवी दिल्ली
भारतीय हवाई दलातर्फे (आयएएफ) देशातील सर्वात मोठा हवाई सराव तरंग शक्ती २४ ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या १० परदेशी हवाई दल आणि १८ देश निरीक्षक म्हणून सहभागी होतील. या कार्यक्रमामुळे आपली स्वदेशी लष्करी क्षमता जगासमोर दाखवता येईल, असे भारतीय हवाई दलाचे व्हाईस एअर मार्शल एपी सिंग यांनी सांगितले.
हा सराव दोन टप्प्यांत आयोजित केला जाणार असून ६ ते १४ ऑगस्ट दरम्यान तामिळनाडूमधील सुलूर हवाई तळावरील सरावाने सुरुवात होईल. दुसरा टप्पा २९ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान जोधपूर येथे रंगेल. प्रत्येक टप्प्यात लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, स्पेशल ऑपरेशन प्लेन, मिड-एअर रिफ्युलर आणि एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम विमानांसह ७० ते ८० विमानांचा सहभाग असेल, असे आयएएफ अधिकाऱ्यांनी सांगितले. या हवाई सरावामुळे काही व्यावसायिक विमान सेवेच्या उड्डाणांची वेळ बदलावी लागेल किंवा काहीचे मार्ग बदलले जातील, असे हवाई दल अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले.