ब्रासिलिया :
भारतीय जातीची ओंगोले गाय ब्राझीलमध्ये ४० कोटी रुपयांना विकली गेली. या गायीची प्रजाती मूळची भारतातील आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील आहे. तिला व्हिएटिना-१९ एफआयव्ही मारा इमोव्हिस म्हणून ओळखले जाते. ब्राझीलमध्ये एका लिलावादरम्यान या गायीची किंमत ४.८ दशलक्ष अमेरिकन डॉलर होती, जी भारतीय रुपयांमध्ये जवळपास ४० कोटी रुपये इतकी आहे. यामुळे ही जगातील सर्वात महागड्या किमतीत विकली जाणारी गाय आहे.
रेशमी पांढरी फर आणि खांद्यावर विशिष्ट कुबड असलेली ही गाय मूळची भारतीय वंशाची आहे. या गायीचे नाव नेल्लोर जिल्ह्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ब्राझीलमध्ये या जातीला मोठी मागणी आहे. या जातीला वैज्ञानिकदृष्ट्या बॉस इंडिकस असे म्हणतात. शास्त्रज्ञांच्या मते, हा भारतातील ओंगोले गुरांचा वंशज आहे. तो त्याच्या ताकदीसाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे, हा वंश वातावरणानुसार स्वतःला जुळवून घेतो. ओंगोले जातीच्या गुरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिशय उष्ण तापमानातही जगू शकतात. कारण त्यांची चयापचय क्रिया चांगली असते. त्यांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. ब्राझीलमध्ये खूप गरम हवामान असते, त्यामुळे या गायीला तिथे पसंती मिळते. ही प्रजाती १९६८ मध्ये जहाजाने प्रथमच ब्राझीलला पाठवण्यात आली होती. १९७० च्या दशकात आणखी अनेक गायी येथे नेण्यात आल्या.