भीमाशंकर मंदिरात प्लास्टिक बाटली,पिशवी नेण्यास बंदी

पुणे- खेड तालुक्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आणि परिसरामध्ये प्लास्टिक गंगाजल बाटली व दूध पिशवी आणण्यास बंदी घालण्यात आली आहे,अशी माहिती श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे विश्वस्त दत्तात्रय कौदरे व मधुकरशास्त्री गवांदे यांनी दिली.

श्री क्षेत्र भीमाशंकर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे. दरवर्षी संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये येथील पवित्र शिवलिंगाचें दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येत असतात. पौर्णिमेनंतर म्हणजेच यावर्षी २२ जुलैपासून उत्तर भारतीय भाविकांचा श्रावण सुरू झाला आहे.तर महाराष्ट्रात ५ ऑगस्टपासून श्रावण सुरु होत असून ५ ऑगस्ट,१२ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, २६ ऑगस्ट व २ सप्टेंबर असे सात सोमवार येत आहेत.यादिवशी भाविक श्रद्धेपोटी मोठ्या प्रमाणात शिवलिंगावर गंगाजल व दूध वाहतात.हे दोन्हीही द्रवपदार्थ प्लॅस्टिक पिशवी किंवा बाटलीमध्ये आणतात. मात्र यंदा अशा बाटल्या आणि पिशव्यांवर बंदी घालण्यात आली आहे.हा मंदिर परिसर प्लास्टिकमुक्त व प्रदूषणमुक्त करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.