मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक

मुंबई – मध्य रेल्वेवर सलग तीन दिवस रात्रीचा ब्लॉक रेल्वे प्रशासनाने जाहीर केला आहे. मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डातील सिझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्वीचच्या नूतनीकरणासह इतर कामांसाठी २६, २७ आणि २८ नोव्हेंबरला विशेष रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक निश्चित केला आहे. ब्लॉकमुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून, लोकल सेवेवर मात्र कोणताही परिणाम होणार नाही. यामुळे काही गाड्या अंशतः रद्द आणि काही गाड्यांच्या थांब्यात बदल केला आहे.

२६ नोव्हेंबर रोजी रात्री १२.५० ते पहाटे ५.५० वाजेपर्यंत ब्लॉक असेल.यादिवशी पाच रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत चालवण्यात येतील. २५ नोव्हेंबर रोजी सुटणारी कोचुवेली-एलटीटी एक्स्प्रेस, २४ नोव्हेंबर रोजी शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस आणि गोरखपूर-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल.२७ नोव्हेंबर रोजी रात्री १२.४० ते पहाटे ५.४० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. २५ नोव्हेंबर रोजी शालीमार-एलटीटी ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस, शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, विशाखापट्टणम-एलटीटी एक्स्प्रेस आणि गोरखपूर-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल. तर २८ नोव्हेंबर रोजी रात्री १ ते सकाळी ६ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी सुटणारी अयोध्या छावणी- एलटीटी एक्स्प्रेस, शालीमार- एलटीटी एक्स्प्रेस, विशाखापट्टणम – एलटीटी एक्स्प्रेस आणि गोरखपूर-एलटीटी अतिजलद एक्स्प्रेस, २७ नोव्हेंबर रोजी सुटणारी बल्लारशाह-एलटीटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंत चालवण्यात येईल.

दरम्यान, नूतनीकरण झाल्यानंतर सिग्नल यंत्रणा अधिक कार्यक्षम होईल. त्यामुळे गाड्यांची गती वाढविणे शक्य होईल, सिझर क्रॉसिंग व डबल डायमंड स्वीच बदलल्यामुळे रेल्वे रुळांवरील अपघात कमी होण्याची शक्यता आहे. प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित होईल. अधिक कार्यक्षम यंत्रणेमुळे गाड्या वेळेवर धावतील.