माजी पंतप्रधान व पत्नीचे नेदरलँडमध्ये इच्छामरण

अ‍ॅमस्टरडॅम – नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्रीस व्हॅन एग्ट आणि त्यांच्या पत्नी यूजीनी व्हॅन एग्ट- क्रेकेलबर्ग या दोघांनी वयाच्या 93 व्या वर्षी इच्छामरण स्वीकारत ‘हातात हात घालून’ एकत्र जगाचा निरोप घेतला. गेली काही वर्षे एग्ट दुर्धर आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या पत्नीही आजारपणाने त्रस्त होत्या. नेदरलँडमध्ये विशिष्ट परिस्थितीत इच्छामरणाला परवानगी आहे. तो गुन्हा ठरत नाही. दोघांना एकाचवेळी विषाचे इंजेक्शन देण्यात आले.
नेदरलँडचे माजी पंतप्रधान ड्रीस व्हॅन एग्ट हे 93 वर्षांचे होते. 2 फेब्रुवारी रोजी त्यांनी त्यांचा 93 वा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी 5 फेब्रुवारी रोजी त्या दोघांना इच्छामरण देण्यात आले. एग्ट यांच्या पत्नीही 93 वर्षांच्या होत्या. दोघांनी सुमारे 70 वर्षांहून अधिक काळ एकत्र घालवला. पत्नीचा उल्लेख ते नेहमी ‘माय गर्ल’ असा करत.
2019 मध्ये पॅलेस्टाइनसाठी एग्ट यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात भाषण देत असताना त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यातून ते पूर्णपणे बरे झाले नाहीत. त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने इच्छामरणाची परवानगी मागितली होती.
ड्रीस एग्ट हे 19 डिसेंबर 1977 ते 4 नोव्हेंबर 1982 या कालावधीत पंतप्रधान होते. राजकारण सोडल्यानंतर त्यांनी एका स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. ते एक उत्तम सायकलपटू होते. पण आजारपणात त्यांची सायकलची साथही सुटली.
एग्ट यांच्या इच्छामरणाचे ‘वृत्त द राइट्स फोरम’ या संस्थेने जाहीर केले. एग्ट आणि त्यांच्या पत्नीवर उत्तरेकडील निजमेगन या शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले. नेदरलँडमध्ये 12 वर्षांवरील व्यक्तींना इच्छामरणाचा कायदेशीर अधिकार आहे. मात्र हा अधिकार केवळ अशा रुग्णांना दिला जातो ज्यांना असह्य त्रास होत असून त्यांची प्रकृती सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही. दुर्धर आजार झालेल्या रुग्णांना इच्छामरणाचा कायदेशीर पर्याय देणारा नेदरलँड हा पहिला देश आहे. 1973 साली या देशात एका मुलीने आपल्या वेदनेने विव्हळणार्‍या आईच्या सततच्या विनंतीवरूनच तिला इच्छामरण दिले. त्यानंतर हा विषय चर्चेला येऊन त्याला कायदेशीर मान्यता दिली. भारतात इच्छामरण हा कायद्याने गुन्हा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top