माथाडी संघटनांचे २६ फेब्रुवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषण

पुणे- माथाडी कायदा संपुष्टात आणणारे आणि सुमारे ८० टक्के माथाडी कामगारांना बेरोजगार करणारे माथाडी अधिनियम, १९६९ सुधारणा विधेयक क्रमांक ३४ हे मागे घ्यावे आणि शासनाच्या पणन विभागाने काढलेले परिपत्रक मागे घ्यावे,अन्य प्रश्नांची सोडवणुक करण्याच्या मागणीसाठी राज्यातील सर्व माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते येत्या २७ फेब्रुवारी पासून मुंबईतील आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार आहेत.माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतीने हे आंदोलन केले जाणार आहे. माथाडी कायदा बचाव कृती समितीची राज्यस्तरीय संयुक्त बैठक नुकतीच पुण्यातील हमाल भवन, मार्केट यार्डमध्ये ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव आणि माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.या संयुक्त बैठकित माथाडी कायदा बचाव कृती समितीमधील संघटनांचे प्रमुख कामगार नेते आमदार शशिकांत शिंदे, भाई जगताप,बळवंतराव पवार,गुलाबराव जगताप, पोपटराव देशमुख ,दिपक रामिष्टे,अरुण रांजणे,राजन म्हात्रे,राजकुमार आघाळ यांच्यासह अन्य माथाडी कामगार नेते उपस्थित होते. या बैठकीत नागपूर हिवाळी अधिवेशानादरम्यान झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी अद्याप झालेली नसून राज्य सरकारने दिलेला शब्द पाळला नसल्याच्या निषेधार्थ हा आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला.तसेच सरकारने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांबरोबर माथाडी कायदा बचाव कृती समितीची संयुक्त बैठक आयोजित करावी अशी मागणीही करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top