मिरज- मिरज बार असोसिएशनचे सभासद असलेले अॅड.सेराब मुश्रीफ यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करत हल्ला करणाऱ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करत न्यायालयीन कामकाज बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय मिरज बार असोसिएशनने घेतला आहे.
यासंदर्भात मिरज बार असोसिएशनच्या सुमारे १५० वकील आणि पदाधिकाऱ्यांनी नुकतेच मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा यांची भेट घेऊन निवेदन दिले. मिरज बार असोसिएशनचे अध्यक्ष एस. आय.आलासे यांनी सांगितले की,हल्ला झालेल्या आमच्या वकील सभासदाची फिर्याद पोलिसांनी घेतली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी असून जोपर्यंत कारवाई होत तोपर्यंत आम्ही न्यायालयीन कामकाज बंद ठेवत आहोत. यावेळी अॅड.श्रीकृष्ण पुटकुळे,बी.एन. पाटील,संदीप परीट आणि पदाधिकारी उपस्थित होते.