मुंबईत मविआला अत्यंत पोषक वातावरण! रोहित पवारांचा विरार ते दादर रेल्वे प्रवास

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज प्रचारादरम्यान विरार ते दादर लोकल रेल्वेने प्रवास केला. यानंतर “आम्ही मुंबईतील राजकीय हवामानाचा अंदाज घेतला. संपूर्ण मुंबईत मविआला अत्यंत पोषक वातावरण असल्याचे जाणवले,” असा दावा रोहित पवार यांनी केला.

रोहित पवार यांनी या संदर्भातील माहिती पोस्टच्या माध्यमातून शेअर केली आहे. यात त्यांनी म्हटले की, “मुंबईत अनेकदा लोकलने प्रवास करण्याची संधी मिळते आणि लोकलचा प्रवास मला आवडतोही. पुढच्या कार्यक्रमाला वेळेत पोहचायचे असल्याने नाशिकची सभा आटपून विरारला आल्यानंतर विरार ते दादर लोकलने प्रवास केला. यावेळी रोज लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांशी चर्चा करून मुंबईतील राजकीय हवामानाचा अंदाज घेतला आणि संपूर्ण मुंबईत मविआला अत्यंत पोषक वातावरण असल्याचे जाणवले.’ दरम्यान रोहित पवार यांनी दिल्लीतील प्राप्तिकर विभागाला लागलेल्या आगीवरुनही टीकास्त्र सोडले. या संदर्भात त्यांनी एक पोस्ट शेअर करत म्हटले की, “काल दिल्लीत आयकर विभागाच्या इमारतीला लागलेल्या आगीत एका कर्मचाऱ्याचे निधन झाले. ही घटना दुर्दैवी आहे. केंद्र सरकारला सत्ता बदलाची खात्री पटल्याने यानंतर कदाचित गृह विभागाच्या कार्यालयात, सीबीआय आणि ईडीच्या कार्यालयांमध्येही आगीच्या घटना घडू शकतात. त्यामुळे त्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यायला हवी. तसेच या परिसरांमध्ये अग्नीशमन दलांची कुमकही वाढवायला हवी.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top