मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस! बारामती ते बुलडाणा अतिवृष्टीने प्रचंड नुकसान


मुंबई – मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आज सर्वदूर मुसळधार पाऊस पडला. बारामती ते बुलडाणा अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले. पावसाने गेल्या अनेक वर्षांचा विक्रम मोडला. शेतात अक्षरशः चिखल झाला. दुकानात, घरांत पाणी शिरून धान्य आणि वस्तू भिजल्याने सामान्य माणसे रडकुंडीला आली. वाहतूक विस्कळीत झाली, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, गाड्या पाण्यात बुडाल्या, इमारती कोसळल्या. पाऊस इतका कोसळला की, दरवर्षी हलक्या पावसात चिंब भिजत लहान मुले खेळत आहेत हे दृश्य दिसलेच नाही.
रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. बारामती तालुक्यात अतिवृष्टी तर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.
कर्जत शहरात आज सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस पडला. शहरातील मुख्य बाजारपेठ, बस स्थानक, महाविद्यालय चौक, मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक आदि भागांत पाणी साचले. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. त्याचबरोबर केळी, डाळिंब, अन्य फळबागा आणि कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.
मंडणगडला सर्वाधिक पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारच्या अल्पशा विश्रांतीनंतर रविवारचा पूर्ण दिवस पुन्हा एकदा पावसाचा होता. मंडणगडमध्ये सर्वाधिक 211.25 मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यात 20 मेपासून सलग पाऊस सुरू असला, तरी आतापर्यंत मंडणगडमध्ये सर्वांत कमी पावसाची नोंद झाली होती. दापोलीत 144.28 मिलिमीटर, चिपळूणमध्ये 123.66 मिमी, संगमेश्वरमध्ये 101.91 मिमी, गुहागरमध्ये 97.20 मिमी, रत्नागिरीत 93.33 मिमी, खेडमध्ये 85.85 मिमी, लांजा 81.20 मिमी, तर जिल्ह्याच्या दक्षिण टोकाच्या राजापूरमध्ये सर्वांत कमी 59.25 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यात सर्वाधिक 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तालुक्यातील वाळवंटी भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.
पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाने थैमान घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी 6 वाजल्यापासून रस्त्यावर उतरून पावसाच्या नुकसानीची पाहणी करीत पंचनामे करण्याचा आदेश देत होते. जोरदार पावसामुळे पुणे – सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. तर इंदापूर, बारामती आणि दौंड तालुक्यांना पावसाने झोडपल्याने काढणीला आलेला भुईमूग, उतरणीला आलेला आंबा आणि भाजीपाल्यासह फळबागांना मोठा फटका बसला. उजनी धरण परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. उजनीतील पाणीसाठा 63.62 टक्के झाला. विशेष म्हणजे पुणे जिल्ह्यातील धरणे उणे पातळीवर असताना उजनीच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने सोलापूरकरांना मोठा दिलासा लाभला आहे. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी हे धरण जीवनदायिनी मानले जाते. दौंड येथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीच्या पाणी पातळीत वाढ झाली.
काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सांगलीतील येरळा नदी दुथडी भरून वाहू लागली. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. कोयना धरणाची पाणी पातळी 23 टक्क्यांवर तर चांदोलीची 22 टक्क्यांवर पोहोचली. सातारा जिल्ह्यातही संततधार पाऊस पडला. कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे कोल्हापूरचे प्रसिद्ध गांधी मैदान पाण्याखाली गेले. पंचगंगा नदीवरील पाच बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले. जिल्ह्यातील बहुतांश मंदिरे पाण्याखाली गेली. जिल्ह्यात गेले आठ दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने नदीची पाणीपातळी एवढ्यातच 17 फुटांपर्यंत पोहोचली. मे महिन्यातच पाणी पातळी एवढी वाढल्याने ऐन पावसाळ्यात काय होईल, अशी धास्ती कोल्हापूरकरांना सतावू लागली आहे.
भीमा नदीला पूर आल्याने नदीवरील सगळे बंधारे ओसंडून वाहत होते. येथे मुसळधार पावसामुळे भात खाचरांचे मोठे नुकसान झाले. महाबळेश्वरमधील लिंगमळा, वेण्णा धबधबा या पहिल्याच पावसात प्रवाहित झाले.
दुष्काळी माण, खटावमध्येही धुमाकूळ
सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माण, खटाव तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातला. एरवी कोरड्या ठाक असणाऱ्या माणगंगा आणि बाणगंगा या नद्यांना पूर आला. त्यामुळे पूल, रस्ते पाण्याखाली गेले. काही ठिकाणी पावसामुळे पडझड झाली. शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बाणगंगा नदीला पूर आल्याने 16 गावांचा संपर्क तुटला. तर 124 कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. माण तालुक्याला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. माणगंगा दुथडी भरून वाहू लागली. बंधारे ओव्हरफ्लो झाले, शेतांमधील माती वाहून गेली. प्रशासनाने दवंडी पिटून नागरिकांना सावधतेचा इशारा दिला. माण तालुक्यातील खडकी येथील पाझर तलाव, आंधळी धरण ओसंडून वाहत होते. असा पाऊस आयुष्यात पहिल्यांदाच बघितला असे येथील ज्येष्ठ नागरिक
सांगत होते.
बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील सूर्या नदीला मुसळधार पावसाने पूर आला. त्यामुळे आसपासच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. शेती पाण्याखाली गेली. शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याला पावसाने आज झोडपून काढले. नगर – कल्याण मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
बारामतीत अजित पवारांकडून पाहणी
बारामती तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र दाणादाण उडाली. त्यातच पिंपळे-लिमटेक गावानजिक निरा डावा कालवा काल रात्री फुटल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. कालव्याचे पाणी गावांमध्ये शिरले. शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतांमधील सकस माती पाण्याच्या लोंढ्यांबरोबर वाहून गेली. पालखी मार्गावरही रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सर्व नियोजित बैठका रद्द करून आज सकाळीच बारामतीत दाखल झाले. सकाळी सहा वाजल्यापासून अजित पवार बारामतीतील पूरग्रस्त भागांना भेटी देत होते.पिंपळे-लिमटेक गावालाही अजित पवार यांनी भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी माध्यमांशी बोलताना तालुक्यातील पूरस्थितीची माहिती दिली. बारामती तालुक्यात मागील शंभर वर्षांत एका दिवसात सर्वाधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आहे. निरा नदीवरील डावा कालवा फुटला. त्यामुळे निरा कालव्यातील पाण्याचे लोंढे आणि त्यातच सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाण्याची पातळी वाढली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मी स्वतः सकाळपासून तहसीलदार आणि जिल्ह्याधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. त्यांना नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश मी दिले आहेत. पंचनामे होताच शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाईची रक्कम देण्याच्या सुचनाही दिल्या आहे.तालुक्यात काही ठिकाणी अतिक्रमणे झाली आहे. त्याबद्दल संबंधितांना सूचना दिल्या आहेत. बारामतीत तीन इमारतींच्या परिसरात जमिनीला मोठ्या भेगा पडल्या. त्यामुळे इमारती खचण्याचा धोका आहे. दौंड, इंदापूर आणि बारामतीत एवढ्या कमी कालावधीत एवढा जास्त पाऊस आजवर कधी झाला नव्हता. पावसाचा जोर दोन दिवस असाच राहण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान खात्याने 28 मे रोजी तालुक्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांची पेरणीची कामे दरवर्षी 1 ते 7 जून या कालावधीत होतात. मात्र अतिवृष्टीमुळे यावर्षी पेरणीची कामे 15 जूनपासून सुरू करण्याच्या सूचना शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले. फलटण तालुक्यातही विक्रमी पाऊस झाला.
किल्ले रायगडकडे जाणारा रस्ता खचला
मुसळधार पावसामुळे किल्ले रायगड महामार्गावरील कोंझर घाटातील धबधब्यातून खाली येणाऱ्या पाण्याच्या दबावामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीच्या परिसरातील बायपास मार्ग खचला. ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले. परिणामी या मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाने काही काळ बंद ठेवली.
बदलापूरच्या बाजारपेठेत पाणी शिरले
उल्हास नदीचा धोका! गावांना इशारा
राज्यभरात पावसाने जोर धरला असताना बदलापूर परिसरातही मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला. येथे अवघ्या चार तासांत तब्बल 160 मिमी पावसाची नोंद झाली. विजेच्या कडकडाटानंतर बदलापूर, अंबरनाथ आणि आसपासच्या परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. रात्रीपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली. नदीने 16.50 मीटर ही इशारा पातळी गाठली. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. उल्हासनदीचे पाणी बदलापूर वांगणी दरम्यान रेल्वे रूळांवर आले तर रेल्वे वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर अग्निशमन दल, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक सतर्क झाले आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
अग्निशमन दलाचे अधिकारी यांनी सांगितले की, उल्हास नदी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचली असून, नदीकाठच्या गावांमधील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे बदलापूर स्टेशन परिसरातील मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे कपडे आणि अन्य मालाचे मोठे नुकसान झाले. बदलापूरच्या रेल्वे भुयारी मार्गात पाणी साचले असतानाही एका चालकाने त्यातून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. पण पाणी दहा फूट वाढल्याने गाडी भुयारी मार्गातच अडकली. सुदैवाने चालक वेळेवर बाहेर पडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. नंतर क्रेनच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढण्यात आली. प्रशासनाने नागरिकांना मुसळधार पावसाच्या काळात भुयारी मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
बेलापूरचे रहिवासी संतापले
नवी मुंबई परिसरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत होत्या. सकाळी साडेआठ ते साडेदहा या दोन तासांत नवी मुंबईत 34.85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. बेलापूर सीबीडीच्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. यामुळे नालेसफाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पालिका ही ठेकेदारांसाठी काम करते असा आरोप रहिवाशांनी केला.