मुंबई विद्यापीठाचा भोंगळ कारभार! हायकोर्टात आव्हान याचिका दाखल

मुंबई- मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी परीक्षेच्या गुणवत्ता यादीत नववा क्रमांक पटकावलेला विद्यार्थी विद्यापीठाच्याच चुकीमुळे एलएलएमच्या प्रवेश प्रक्रियेबाहेर फेकला आहे.उच्च गुणवत्ताधारक असूनही प्रवेश नाकारल्याने या विद्यार्थ्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावत मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराला आव्हान दिले आहे. या याचिकेवर २८ नोव्हेंबरला नियमित खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.
नगरच्या पारनेर तालुक्यातील काकणेवाडी येथील भूषण वाळुंजने मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळेच एलएलएम प्रवेश लटकल्याचा दावा करीत रिट याचिका दाखल केली आहे.भूषणला एलएलएम सीईटी परीक्षेत १०० पैकी ८२ गुण मिळाले आहेत.विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश प्रक्रियेत गुगल फॉर्म भरण्यास सांगितले. त्यानुसार आवश्यक तो सर्व तपशील व शैक्षणिक प्रमाणपत्रांसोबत भूषणने नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रही जोडले होते.हिंदू कुणबी असलेल्या भूषणने केंद्र सरकारकडून मिळालेले नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर केले, मात्र राज्य पातळीवरील नॉन-क्रिमिलेअर जोडले नसल्याचे कारण देत विद्यापीठाने त्याला प्रवेश नाकारला.त्यामुळे मोठा धक्का बसलेल्या भूषणने वरिष्ठ प्रशासनाकडे दाद मागितली,मात्र तेथेही योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.त्याने गुरुवारी स्वतः न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती डी.नीला गोखले यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे याचिका सादर केली. एलएलएम प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्यात असून उच्च गुणवत्ताधारक असूनही प्रवेश न मिळाल्याचे म्हणणे त्याने यावेळी मांडले. त्यावर एलएलएम प्रवेशाच्या अजून दोन फेऱ्या बाकी असल्याची सारवासारव करून विद्यापीठाचे वकील रुई रॉड्रिग्ज यांनी वेळ मारून नेली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top