मुरादाबादमध्ये भारत जोडो यात्रेत प्रियांका गांधींचाही सहभाग

मुरादाबाद – काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा प्रवास उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून झाला. यावेळी राहुल गांधी यांच्याबरोबर प्रियांका गांधीही सहभागी झाल्या. बहीण-भावांचे मुरादाबाद मधील जनतेने मोठ्या उत्साहाने स्वागत केले. राहुल-प्रियंका मुरादाबादच्या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या संख्येने लोक एकत्र जमले होते.

दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथून आज सकाळपासून काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाली. यात्रा पुन्हा सुरू करण्यासाठी काँग्रेसने मुरादाबाद हे शहर निश्चित केले होते. मुरादाबाद हे प्रियांका गांधी यांचे सासर आहे. प्रियांका गांधी या सुमारे दोन वर्षांनंतर आज मुरादाबादमध्ये आल्या होत्या. यापूर्वी त्यांनी १० फेब्रुवारी २०२२ रोजी मुरादाबाद येथे विधानसभेच्या वेळी काँग्रेस उमेदवारासाठी रोड शो केला होता. त्याआधी त्या २ डिसेंबर २०२१ रोजी मुरादाबादला आल्या होत्या. त्यांनी बुद्ध विहार येथील सर्किट हाऊसच्या मागे जाहीर सभेला संबोधित केले होते. प्रियांका गांधी यांचा विवाह मुरादाबाद येथील उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्याशी १९९७ मध्ये झाला होता.
काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, हा प्रवासाचा हा ४२ वा दिवस आहे. संभळ येथून ही यात्रा सुरू होऊन २५ तारखेला आग्रा येथे पोहोचणार असून या वेळी समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव हे यात्रेत सहभागी होणार आहेत. राहुल गांधी केंब्रिज विद्यापीठात जाणार असल्याने भारत जोडो न्याय यात्रा २६ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत विश्रांती घेणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top