- 100 नौका किनाऱ्यावर
मुरूड जंजिरा –
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार पावसाळ्यात 1 जून ते 31 जुलै पर्यंत समुद्रातील मासेमारी बंद राहणार आहे. मात्र समुद्रात २४ मे पासूनच वादळी वातावरण निर्माण झाल्याने त्याआधीच मुरूड परिसरातील एकदरा,राजपुरी,दिघी, येथील समुद्रतील मच्छीमारी बंदी बंद करावी लागली आहे.परिसरातील सुमारे 100 नौका किनाऱ्यावर नांगरण्यात आल्याची माहिती एकदरा गावचे नौका मालक रोहन निशानदार यांनी दिली.अचानक वादळी परिस्थिती आल्याने शेवटच्या सत्रातदेखील धांदल आणि नुकसान सहन करावे लागले आहे, अशा प्रतिक्रिया अनेक मच्छीमारांनी व्यक्त केल्या.
१ जूनपूर्वी किरकोळ मासेमारी करण्याचा आमचा प्रयत्न होता.शेवटच्या मासेमारी सत्रात पदमजलदुर्ग समुद्र परिसरात कोलंबीची मासेमारी सुरू होती.परंतु २४ मेपासून वादळी वातावरणामुळे ही मासेमारीदेखील बंद करावी लागली. बंगालमध्ये कालपासून सुरू असलेल्या रेमल चक्रीवादळाचादेखील आधिक परिणाम अरबी समुद्रात होत असल्याचे रोहन निशानदार आणि अन्य नाखवा मंडळींनी स्पष्ट केले.१२ वाव पेक्षा आधिक खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मोठ्या दालदी नौकांनादेखील याचा फटका बसल्याचे निशानदार यांनी सांगितले. बाहेरून समुद्राचे पाणी शांत वाटत असले तरी समुद्रात गेल्यावर उसळणाऱ्या लाटांच्या घडामोडी धडकी किंवा दुर्घटना घडण्यास कारणीभूत ठरू शकतात असे एकदरा,मुरूड, राजपुरी येथील रोहन निशानदार,किसन गंबास, पांडुरंग आगरकर, गजानन वाघ आदी नाखवा मंडळींनी सांगितले. आज सकाळपासून येथे ढगाळ वातावरण होते.मुरूड समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारला असता खोल समुद्रात नौका दिसून आल्या नाहीत.एकदरा, मुरूड खाडीत नौका नांगरण्यात आल्याचे दिसून आले.