मोदींनी दहा वर्षांत काहीही केले नाही! प्रियांका गांधींची रायबरेलीत टीका

रायबरेली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत काहीही केलेले नाही. त्यांनी केवळ देशाची संपत्ती चार पाच मोठ्या उद्योगपतींच्या हातात देण्याचेच काम केले. त्यांनी केलेल्या नोटाबंदीचा फटका छोटे व्यापारी व दुकानदार व महिलांना बसला. गेल्या दहा वर्षांत देशातील नागरिकांच्या स्थितीत काहीही सुधारणा झाली नसली तरी वृत्त वाहिन्यांवर फार चांगले चित्र उभे केले जात आहे. असा घणाघात आज काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी रायबरेली इथे केला.
रायबरेली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राहुल गांधी यांच्यासाठी आज आयोजित केलेल्या प्रचारसभेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपावर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात कधीही कोणत्याही गावांचा दौरा केलेला नाही किंवा त्यांनी कधी शेतकऱ्याला त्याच्या अडचणी विचारल्या नाहीत. बुधवारपासूनच प्रियांका गांधी या राहुल गांधी यांच्या प्रचारासाठी मतदारसंघात फिरत आहेत. त्यांनी मतदारसंघात गावोगावी जाऊन चौकसभा घेतल्या. मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व इतर सहयोगी पक्षाच्या नेत्याबरोबरही चर्चा करत आहेत. राहुल गांधी दोन्ही मतदारसंघांतून विजयी व्हावेत यासाठी त्यांनी जणू चंगच बांधला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top