‘युपीआय’नंतर आता ‘युएलआय’ येणार बँकांकडून कर्ज मिळणे सोपे होणार

नवी दिल्ली- पैसे देवाणघेवाणीमध्ये क्रांती आणणार्या युपीआय (युनिफाइड पेमेंट इंटरफेस)नंतर सरकारने आता एक आणखी पाऊल पुढे टाकत युएलआय (युनिफाइड लेंडिंग इंटरफेस) आणण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेद्वारे आरबीआय डिजिटल क्रेडिटच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल करण्याच्या तयारीत असूनयामुळे कर्ज घेण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बंगळुरू येथील डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर अँड इमर्जिंग टेक्नोलॉजीज या विषयावरील कार्यक्रमात याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की,पायलट प्रोजेक्टच्या निष्कर्षानंतर युनिफाइड लेंडिंग इंटरफेस लवकरच देशभरात सुरू होणार आहे. संपूर्ण डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये मोठा बदल घडवून आणण्यात युपीआय पेमेंट प्रणाली यशस्वी ठरली, त्याचप्रमाणे युनिफाइड लेंडिंग इंटरफेस ही सुविधा भारतातील कर्ज देण्याच्या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणणार आहे. दरम्यान, देशातील जेएएम (जन-धन-आधार मोबाईल), युपीआय, युएलआय हे त्रिकूट भारताच्या डिजिटल व्यवहारांच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या प्लॅटफॉर्ममध्ये कर्ज देणाऱ्या संस्थांकडे विविध राज्यांच्या जमिनीच्या नोंदीदेखील असतील. त्यामुळे कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांना कमी वेळेत कर्ज सहज उपलब्ध होणार आहे. कर्ज देणाऱ्या संस्थेला एकाच ठिकाणी ग्राहकांची सर्व माहिती मिळणार आहे.या सुविधेमुळे कर्ज न मिळणाऱ्या क्षेत्रातील नागरिकांना लवकर कर्ज मिळण्यास मदत होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top