रक्ताच्या एआय चाचणीने कर्करोगाचे निदान होणार

बीजिंग

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वैद्यकीय क्षेत्रातही होत असून, त्याच्या साहाय्याने कर्करोगाचे निदान होणार आहे. एआयच्या मदतीने रक्ताच्या एखाद्या वाळलेल्या थेंबाच्या नमुन्यातूनही कर्करोगाचे अचूक निदान केले जाऊ शकते, असे एका संशोधनातून सिद्ध झाले आहे. या संशोधनात केलेल्या प्रारंभिक प्रयोगांमध्ये उपकरणांना कर्करोगाचे निदान करण्यासाठी केवळ काही मिनिटे लागली.

गॅस्ट्रिक, कोलोरेक्टर कॅन्सरच्या रुग्णांमध्ये आणि निरोगी लोकांमध्ये फरक करण्यातही उपकरणे सक्षम होती. याबाबत संशोधकांनी म्हटले आहे की, रक्तातील काही रसायनांचा छडा लावून या चाचणीच्या माध्यमातून सुमारे ८२ ते १०० टक्के प्रकरणांमध्ये कर्करोगाचे निदान केले जाऊ शकते. या नव्या उपकरणात मशिन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे. ते रक्ताच्या नमुन्यातील मेटाबोलाईटच्या बायप्रॉडक्टचे विश्लेषण करते. मेटाबोलाईट रक्ताच्या तरल भागात आढळते, ज्याला ‘सीरम’ म्हणून ओळखले जाते. हे मेटाबोलाईट बायोमार्करचे काम करतात, तेच शरीरातील संभाव्य कर्करोगाच्या अस्तित्वाचा छडा लावतात. चीनच्या वैज्ञानिकांनी या चाचणीची पद्धत विकसित केली आहे. त्याबाबतची माहिती एका मासिकात प्रसिद्ध केली आहे.

कोलोरेक्टल व गॅस्ट्रिक कॅन्सरसारखे कर्करोगाचे प्रकार गंभीर असूनही त्यांची कोणतीही चाचणी अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे हे नवे संशोधन महत्त्वाचे ठरेल. सध्या या कर्करोगांचे निदान करण्यासाठी इमेजिंग किंवा शस्त्रक्रिया गरजेची असते, मात्र या नव्या चाचणीमध्ये कर्करोगाचे निदान करण्यासाठी ०.०५ मिलिलिटरपेक्षाही कमी रक्ताची आवश्यकता असते. दरम्यान, अल्बर्ट आईन्स्टाईन कॉलेज ऑफ मेडिसीनमधील डॉ. चुआन कुआंग यांनी सांगितले की, द्रवरूप रक्ताच्या तुलनेत कोरडे रक्त गोळा करणे, सुरक्षित ठेवणे आणि एका जागेवरून दुसरीकडे नेणे हे सोपे, स्वस्त ठरू शकते आणि सहज उपलब्य उपकरणांनी ते करता येऊ शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top