नवी दिल्ली – देशाच्या राज्यघटनेच्या पहिल्या आवृत्तीतील एक प्रत लिलावामध्ये तब्बल 48 लाख रुपयांना विकली गेली आहे. या प्रतीचे वैशिष्टय म्हणजे त्यावर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छापील स्वाक्षरी आहे.
सन 1950 मध्ये सर्व्हे ऑफ इंडिया, डेहराडूनने घटनेची ही पहिली आवृत्ती तयार केली होती. तर भारत सरकारच्या वतीने या घटनापुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले
होते. पहिल्या आवृत्तीमध्ये फक्त 1 हजार प्रती छापण्यात आल्या होत्या. त्यापैकी एक प्रत नुकतीच लिलावात विकली केली आहे. 48 लाख रुपये ही या आवृत्तीतील एका प्रतीसाठी मिळालेली सर्वाधिक किंमत आहे.
या आवृत्तीतील सर्व प्रतींवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छापील स्वाक्षरीसह प्रेमबिहारी नरैन रायजादा यांची कॅलिग्राफी आणि मॉडर्न आर्ट शैलीतील ख्यातनाम चित्रकार नंदलाल बोस यांच्या चित्रकृती छापल्या आहेत.रायजादा यांना पुस्तिकेत घटनेची कलमे कॅलिग्राफी शैलीत लिहिण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला होता. नोव्हेंबर 1949 ते एप्रिल 1950 असे सहा महिने खपून त्यांनी हे काम पूर्ण केले. या कामासाठी त्यांना त्याकाळी 4 हजार रुपये मानधन देण्यात आले होते.
या व्यतिरिक्त या घटना पुस्तिकेमध्ये 1946 च्या घटना परिषदेच्या सदस्यांच्या हाताचे ठसे, लघुकथा लेखक कमला चौधरी यांनी हिंदी भाषेत केलेली स्वाक्षरी आणि तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इंग्रजी भाषेत केलेली स्वाक्षरी आहे. संसदेच्या वाचनालयात हेलियम वायू भरलेल्या खास पेटीत घटनापुस्तिकेची ही प्रत सुरक्षित ठेवण्यात आली होती. दरम्यान, सॅफ्रॉनआर्ट या प्राचीन मौल्यवान वस्तुंचा लिलाव करणार्या कंपनीने 24 ते 26 जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या लिलावात सर्वात विक्रमी किंमत फ्रँकॉईज बाल्थझार सॉल्व्हेन्स यांच्या सन 1812 मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीला मिळाली. या कादंबरीवर तब्बल 1 कोटी 14 लाख रुपयांची विक्रमी बोली लावण्यात आली. या कादंबरीला जगभरात आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे. नामवंत अशा रॉथशिल्ड परिवारातील सदस्य बॅरॉन डी रॉथशिल्ड यांच्या खासगी संग्रहातून ही कादंबरी मिळविण्यात आली होती. कादंबरी इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत लिहिण्यात आली आहे. त्यात 18 व्या आणि 19 व्या शतकातील तत्कालीन कोलकाता शहराची काही दुर्मिळ छायाचित्रे आहेत.
