राज्यात कैद्यांची संख्या वाढली! नव्या १३ कारागृहांचा प्रस्ताव

नागपूर -राज्यात गेल्या काही वर्षांत कैद्यांची संख्या वाढल्याने राज्यात १३ नवीन कारागृहे बांधण्यात येणार आहेत. राज्यातील गुन्हेगारांच्या वाढत्या प्रमाणामुळे हा निर्णय घेण्यात आला असून यासाठी जमिन अधिग्रहित करण्यात आली आहे. हिंगोली, ठाणे, गोंदिया, जळगाव-भुसावळ, पालघर, तुर्भे, येरवडा, नगर-नारायणडोह, नांदेड, अलीबाग, बीड, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात नव्याने कारागृह उभारण्यात येणार आहेत. शासनाकडून जमीन अधिगृहित करण्यात आली असून लवकरच नव्या कारागृहाच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे.

राज्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून कारागृहात डांबण्यात येणाऱ्या गुन्हेगारांची संख्याही वाढत आहे. मात्र, कैद्यांच्या तुलनेत कारागृहांची संख्या कमी असल्याने एका एका कारागृहात दुप्पट-तिप्पट कैदी ठेवण्यात येत आहेत. यासाठी आता राज्यात जवळपास १५ हजार कैद्यांना सामावून घेण्याच्या क्षमतेचे आधुनिक पद्धतीची १३ नवीन कारागृह तयार करण्यात येत आहे. राज्यात सध्या कारागृहातील कैद्यांची संख्या अधिक आहे.

कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी ठेवण्याच्या यादीत देशभरातून महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर उत्तरप्रदेश-बिहार आहे. सध्या राज्यात ६० कारागृहे असून त्यात २६ हजार ३७७ बंदिवान ठेवता येतील एवढी क्षमता आहे. मात्र, कारागृहात क्षमतेपेक्षा जवळपास दीडपट म्हणजेच ४० हजार ४८५ कैदी बंदिस्त आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कारागृहात कैद्यांमध्ये हाणामार्या किंवा टोळीयुद्ध होत असल्याच्या घटना घडत आहेत. एकमेकांवर प्राणघातक हल्ला करणे किंवा खून करण्यापर्यंत घटना घडत आहेत. तसेच कारागृहातील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरही कैदी हल्ले करीत असल्याच्या अनेक घटना राज्यभरात घडत आहेत. राज्यात उपलब्ध कारागृहात क्षमतेपेक्षा कैदी असल्यामुळे कुख्यात कैद्यांसह साधे कैदीही एकाच बरॅकमध्ये ठेवण्यात येतात. त्यामुळे कुख्यात कैद्यांकडून नेहमी न्यायाधीन कैद्यांवर अत्याचार होत असतात.
कारागृहात होणाऱ्या घटना टाळण्यासाठी नवीन कारागृहाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव राज्य कारागृह विभागाने गृहमंत्रालयाला दिला होता. त्यावर लगेच अंमलबजावणी करीत जवळपास नवीन १३ कारागृहे निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. सध्या राज्यात ९ मध्यवर्ती कारागृहे असून त्यात कल्याण आणि लातूर मध्यवर्ती कारागृहाची भर पडणार आहे. कल्याण आणि लातूर येथे पूर्वी जिल्हा कारागृह होती, परंतु त्यांचे आता मध्यवर्ती कारागृहात रूपांतरित करण्यात येणार आहे. लवकरच त्यांचे उद्धाटन होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top