मुंबई:- राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकासान झाले. मात्र अवकाळी पावसाचे संकट अद्याप कायम आहे. आता पुढील ४ दिवस राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.राज्यात पुन्हा एकदा २४ मार्चपासून अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात या आठवड्यात पावसाची शक्यता कायम आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे, तर सिंधुदुर्गात आज, बुधवारी पाऊस पडू शकेल. धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवार आणि शनिवारसाठी यॅलो अर्लट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार श्रीलंकेपासून विदर्भापर्यंत ९०० मीटरपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्यामुळे पुढील चार दिवस राज्यातील काही भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. तसेच राज्यात पुढच्या तीन दिवसात पावसासह गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आहे. याचा फटका उत्तर महाराष्ट्राला बसू शकतो. शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, गुहागरमध्येही अवकाळीने हजेरी लावल्यामुळे काजू आणि आंबा बागायदारांपुढे संकट ओढावले आहे.