राज ठाकरे यांचे प्रमुख नेते महायुतीचा प्रचार करणार स्वतः सभा घेण्याबाबत तूर्त मौन

मुंबई – राज्यात भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) नेतृत्वाखालील महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महायुतीचा प्रचार करण्याचे आदेश दिले. बैठकीनंतर राज ठाकरे यांनी ही माहिती दिली. मात्र राज ठाकरे स्वतः प्रचारसभा घेणार का, असा प्रश्न विचारला असता त्याबद्दल काही निश्चित ठरले नाही, असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले.
मोदी सरकारचे पहिल्या पाच वर्षांतील काही निर्णय आणि सरकारची धोरणे आपल्याला पटली नव्हती त्यामुळे आपण त्यावेळी मोदी सरकारवर टीका केली होती. मात्र आता काश्मीरमधील कलम 370 रद्द करणे, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनसीआर), राममंदिराची उभारणी यांसारख्या मोदी सरकारच्या कामगिरीचे आपण कौतुक केले. एकीकडे कडबोळे आणि दुसरीकडे मोदींचे खंबीर नेतृत्व यामुळे पंतप्रधान मोदींना तिसर्‍यांदा संधी दिली गेली पाहिजे असे आपल्याला वाटले म्हणून आपण महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. सुप्रीम कोर्टात राममंदिराचा निर्णय झाल्यावरही मोदी नसते तर राममंदिर झाले नसते. ते होते म्हणून राममंदिर झाले असे स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले.
मात्र हे सांगताना त्यांनी अपेक्षेप्रमाणे उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका करताना किंवा आता चांगल्या निर्णयांसाठी मोदी सरकारचे कौतुक करताना त्याबदल्यात आपण काहीही मागितले नाही. मला मुख्यमंत्री करा, माझे आमदार चोरले म्हणून मोदींवर टीका करायची असे काही आपण केलेले नाही,असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.
राज ठाकरे म्हणाले की मनसेच्या सर्व कार्यकत्यांना महायुतीचा प्रचार करण्याचे आदेश देताना आपण महायुतीच्या नेत्यांनी कोणत्या मतदारसंघात आमच्या कोणत्या पदाधिकार्‍याशी संपर्क ठेवायचा याची यादी आपण लवकरच महायुतिला देऊ. माझ्या पदाधिकार्‍यांचा योग्य आदर ठेवतील अशी आशा आहे. महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणे, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे संवर्धन करणे असे राज्याशी संबंधित जे विषय आहेत त्यांचा मी पाठपुरावा करणार आहे .
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही राज ठाकरे यांनी यावेळी उत्तर दिले. ज्याला कावीळ झालेली असते त्याला सारे जग पिवळे दिसू लागते. ते (संजय राऊत) आत्ताच आतून बाहेर आले आहेत. त्यामुळे त्यांना तसे वाटते,असे राज ठाकरे म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top