नागपूर – नागपूर जिल्ह्यातील रामटेक विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून शिंदे गट आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.शिंदे गटाचे अॅड आशिष जैस्वाल हे येथील विद्यमान आमदार आहेत. यावेळी त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिली तर आपण त्यांचा प्रचार करणार नाही,अशी भुमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा निवडणुकीतही रामटेकसाठी आग्रही आहेत.तर भाजपाचे माजी स्थानिक नेते आणि पदाधिकारी जैस्वाल यांच्याविरोधात आहेत.कोणत्याही परिस्थितीत रामटेकची जागा भाजपानेच लढवावी असा त्यांचा आग्रह आहे. त्यावरून येथे शिंदे गट आणि भाजपात वाद निर्माण झाला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाने माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी यांना उमेदवारी दिली होती.त्यावेळी जैस्वाल हे अपक्ष लढून विजयी झाले.त्यामुळे आता महायुतीने जैस्वाल यांना उमेदवारी दिली तर भाजपाचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करणार नाहीत.भाजपाचे नागपूर जिल्हा प्रभारी कैलास विजयवर्गीय यांनी काल घेतलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोरची ही भूमिका मांडली.