रामदेवबाबा आणि बाळकृष्णांवर सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे

नवी दिल्ली- योग गुरु रामदेवबाबा व त्यांचे भागीदार बाळकृष्ण यांच्या पतंजली कंपनीने औषधाच्या परिणामांबाबत फसव्या जाहिराती दिल्या असा आरोप करीत भारतीय वैद्यकीय संस्थेने
सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, या प्रकरणी आज सुनावणीवेळी न्या. हिमा कोहली व न्या.अहसानुद्दीन अमानुल्ला यांनी रामदेवबाबा व बाळकृष्ण यांच्यावर कडक ताशेरे ओढले. देशाची माफी मागा, असे न्यायालयाने बजावले.
पतंजली आपल्या औषधांबाबत फसवे दावे करीत असल्याने या दाव्यांचा प्रसार त्वरित थांबवा असा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिल्यानंतरही या जाहिराती सुरू राहिल्या. किंबहुना आपले दावे योग्य आहे असे रामदेवबाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. यामुळे न्यायालय संतप्त झाले. न्यायालयाचा अवमान केला म्हणून पतंजलीला माफी मागण्यास सांगण्यात आले. माफीनाम्याचे प्रतिज्ञापत्र घेऊन दोघांना आज न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले.
यावेळी झालेल्या युक्‍तिवादात रामदेवबाबा यांनी प्रतिज्ञापत्रात लिहिले की, न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आमच्या प्रचार विभागाला माहीत नसल्याने जाहिराती सुरू राहिल्या. हा युक्‍तिवाद खोडून काढत न्यायालयाने रामदेवबाबांना खूप सुनावले. त्याचबरोबर सरकारच्या आयुष विभागालाही जाब विचारला की, आयुर्वेदिक औषधे ही केवळ पूरक आहेत हे तुम्ही जाहीर का सांगत नाही, कोरोनाच्या वेळी तुम्ही ही जनजागृती करायला हवी होती.
रामदेवबाबा व बाळकृष्ण यांनी प्रतिज्ञापत्रासोबत कागदपत्रे जोडल्याचे नमूद केले होते. प्रत्यक्षात कोणताच कागद जोडला नव्हता. या सर्व बाबींमुळे न्यायालय संतप्त झाले. सर्व कागदपत्रे सादर करून प्रतिज्ञापत्रही नव्याने द्यावे, असा आदेश देऊन न्यायालयाने 10 एप्रिलला पुढील सुनावणी ठेवली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top