नवी दिल्ली – योगगुरु रामदेव बाबा आणि त्यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीला सुप्रीम कोर्टाने आज चांगलाच दणका दिला. फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्याचे न्यायालयाने आदेश देऊनही पतंजलीने त्या जाहिराती सुरूच ठेवल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे. त्यामुळे न्यायालयाने पतंजलीला अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावली.
इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पतंजलीच्या औषधी उत्पादनांच्या फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.अलोपॅथी उपचार पध्दतीबद्दल खोटी माहिती पतंजलीच्या जाहिरातींमधून लोकांमध्ये पसरवली जात आहे,असे असोसिएशनने सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर न्या.अहसानुद्दीन अमनुल्लाह आणि न्या. प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली .त्यावेळी औषधी उत्पादनांच्या अशा प्रकारच्या खोटे दावे करणाऱ्या जाहिराती करणे थांबवण्याचे आदेश न्यायालयाने पतंजली आयुर्वेदला दिले होते.तसेच पुढील सुनावणी फेब्रुवारीमध्ये घेऊ असे सांगितले होते.
आज या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी आयएमएच्या वतीने पतंजलीच्या फसव्या जाहिराती आजही दाखवल्या जात आहेत,असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर संताप व्यक्त करीत न्यायालयाने बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांना अवमान नोटीस बजावली.