नवी दिल्ली – भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजी सरकारकडून कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती कार्यालयाने एक्सवरील ( पूर्वीचे ट्विटर) पोस्टद्वारे दिली आहे.फिजीचे राष्ट्रपती रातू विल्यम मावेलीली काटोनिवेरे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर या फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने आज सन्मानित केले.मैत्रीच्या घनिष्ठ नातेसंबंधांचे हे प्रतिबिंब आहे, असे राष्ट्रपती मुर्मू यांनी सन्मान स्वीकारल्यानंतर म्हटले. दोन्ही देशांमधील सौहार्दपूर्ण संबंधांचे कौतुक करताना, भारत हा जागतिक स्तरावर एक सर्वोत्तम देश म्हणून उदयास येत आहे. एक मजबूत आणि अधिक समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी भारत हा फिजीसोबत अनेक महत्वपूर्ण करार करण्यास तयार आहे, असे त्यांनी फिजीच्या संसदेला संबोधित करताना म्हटले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या फिजीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.
