राष्ट्रवादीचे माजी खासदार जैन यांची ३१५ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि जळगावचे माजी राज्यसभा खासदार ईश्वरलाल जैन आणि त्यांचे चिरंजीव मनीष जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सची तब्बल ३१५.६० कोटींची मालमत्ता सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने जप्त केली.भारतीय स्टेट बँकेची फसवणूक केल्याचा तीन तक्रारी सीबीआयने जैन यांच्याविरोधात दाखल केल्या आहेत.

ईडीने ईश्वरलाल जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या बँक फसवणूक प्रकरणाची संबंधित जळगाव,मुंबई,सिल्लोड, ठाणे आणि गुजरात मधील कच्छमध्ये तब्बल ७० ठिकाणांवर छापे घातले. मनी लॉंड्रिंग व्यवहारातील तब्बल ३१५.६० कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. जैन यांनी स्टेट बँकेकडून घेतलेल्या कर्जापोटी या स्थावर आणि जंगम मालमत्ता गहाण ठेवल्या होत्या. तसेच त्यांनी बॅंकेच्या सुविधांचा गैरवापर करत कर्जाचा पैसा इतर कारणांसाठी वापरला होता.

ही कर्जे घेताना बॅंकेला बनावट कागदपत्रे सादर केली आणि अस्तित्वात नसलेला सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा साठा दाखविल्याचे ईडी चौकशीत उघड झाले आहे.त्यामुळे जैन यांच्याविरुद्ध मनी लाँड्रीगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी याआधीही जैन यांच्या दुकानांवर आणि छापे टाकून तपासणी केली होती. त्यावेळी सोने दागिने, कागदपत्रे आणि रोख रक्कम जप्त केली होती. पण आता ही संपूर्ण मालमत्ताच जप्त केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top