लव्ह जिहाद, व्होट जिहाद! फडणविसांनी अपमान केला

मुंबई- लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशा प्रकारची वक्तव्ये राज्याचा गृहमंत्री करत आहेत, हे अत्यंत लाजिरवाणे आहे. हे त्यांचे व्यक्तिगत मत नाही तर ते गृहमंत्री म्हणून बोलत आहेत. व्होट जिहाद म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी समतेच्या मुल्याचा अपमान केला असून त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेत नाना पटोले म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना छत्रपती शिवाजी महाराज व महाराजांचा इतिहासच माहित नाही. महाराजांच्या सैन्यात अठरापगड जातीच्या मावळ्यांसह मुस्लीमही होते. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले व आंबेडकरांच्या महाराष्ट्राने देशाला समतेचा संदेश दिला, त्याच राज्याचा गृहंमत्री लव्ह जिहाद, व्होट जिहाद अशी वक्तव्ये करतो हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. लव्ह जिहादचे प्रकार होत असतील तर त्यावर कारवाई केली पाहिजे, ते स्वतः गृहमंत्री आहेत, कारवाई करण्याचे अधिकार त्याच्यांकडे आहेत मग कारवाई का करत नाहीत. त्यांच्याच पक्षाचा एक आमदार एका धर्माला शिव्या देत महाराष्ट्र तोडण्याचे पाप करत आहेत. महाभ्रष्ट महायुतीचे अडीच वर्षातील अपयश आणि भ्रष्टाचार झाकण्यासाठी फडणवीस आणि महायुतीकडून अशा प्रकारची धार्मिक तणाव निर्माण करणारी वक्तव्ये केली जात आहेत पण राज्यातील सुज्ञ जनता याला बळी पडणार नाही असे पटोले म्हणाले.
मोदी-शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्याचा फायदा मविआलाच..
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राकडे एटीएम म्हणून पाहतात. हे त्यांना पैसे देणारे एटीएम मशीन वाचवण्यासाठी ते शेवटचा प्रयत्न करत आहेत. परंतु नरेंद्र मोदी व अमित शाह जेवढे जास्त महाराष्ट्रात येतील त्याचा फायदा महाविकास आघाडीलाच होईल, असेही नाना पटोले म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top