पनवेल – राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान करायला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. लालपरी मोठ्या प्रमाणात निवडणुक कामासाठी गेल्यामुळे काल रात्रीपासून पनवेल बस स्थानकात प्रचंड प्रमाणात गर्दी झाली. अलिबाग, मुरुड, महाड , माणगाव ,खेड, रत्नागिरी इत्यादी गावामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.विविध आगारांतील मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के बसेस निवडणूक कामाला जपण्यात आल्या आहेत. काल रात्रीपासून ते आज दुपारपर्यंत एसटीच्या गाड्याच उपलब्ध नव्हत्या. ज्या होत्या त्याही कमी पडत होत्या. त्यातच मुंबई, बोरिवली या ठिकाणाहून कोकणात जाणाऱ्या गाड्याही पनवेल आगारात भरून येत होत्या. त्यामुळे प्रवाशांचे अधिकच हाल झाले. त्या बद्दल प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला. हतबल झालेल्या एसटीच्या अधिकाऱ्यांनी लोकांना संयम राखण्याचे आवाहन केले. तालुक्याच्या ठिकाणापासून लहान गावांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना अधिक त्रास सहन करावा लागला.
