वसई ते भाईंदर १० मिनिटांत अखेर रो-रो प्रवासी सेवा सुरू

वसई- मीरा भाईंदर ते वसई, विरार या शहरांतील अंतर कमी करणाऱ्या रो-रो बोट सेवेला काल मंगळवारपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात करण्यात आली आहे.यामुळे आता वसई-मीरा भाईंदर हे अंतर फक्त १० मिनिटांत पार करता येणार आहे.

या रो-रो बोटीचे सुरक्षित नौकानयन, बोटीतून प्रवासी व वाहनांचे सुलभ चढ-उतार आणि सुयोग्य नौकानयन मार्ग या सर्व बाबींची खात्री झाल्यानंतर या फेरीबोट सेवेचा लोकार्पण सोहळा औपचारिकरित्या करण्यात येणार आहे. काल झालेल्या उद्घाटनप्रसंगी आमदार क्षितिज ठाकूर,भाजपचे वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील तसेच बविआ व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. २०१७ पासून या ‘सागरमाला प्रकल्पा’ चे काम सुरू होते. परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे हा प्रकल्प पूर्ण व्हायला उशीर झाला होता.

सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत ही फेरीबोट चालवली जात आहे. या फेरीबोटीची क्षमता ३३ वाहने व १०० प्रवासी इतकी आहे. अवघ्या दहा मिनिटांचा हा समुद्री मार्ग असणार आहे.काल या समुद्री मार्गातील रो रो सेवेची सुरुवात झाल्यानंतर अनेक स्थानिक नागरिकांनी या बोटीतून प्रवास केला. ही सेवा ३ महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून भरती व ओहोटीच्या वेळी या फेरीबोटीच्या मार्गात बदल होणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top