मुंबई
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाने आज मुंबईतील वांद्रे – वरळी सागरी सेतूला सांधणारी दुसरी तुळई (बो आर्च स्ट्रिंग गर्डर) यशस्वीपणे बसवली. हे काम आज सकाळी ६ वाजताच्या दरम्यान पार पडले. खुल्या समुद्रात लाटांचा अंदाज घेत मोठ्या तराफ्याच्या मदतीने ही तुळई जोडली गेली. या जोडणीमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे – वरळी सागरी सेतू मार्ग एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले. गेल्या वर्षी २६ एप्रिल रोजी हाच सेतू मार्ग पहिल्या महाकाय तुळईने सांधण्यात आला होता.
मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. पहिली तुळई बसविताना आजूबाजूला मोकळी जागा असल्याने अभियंत्यांना अंदाज घेण्यासाठी पुरेसा वाव होता. परंतु आज, दुसरी तुळई बसवताना तितकीशी मोकळीक नव्हती. पहिल्या तुळईचा अंदात घेत अतिशय सावधपणे ही मोहीम पार पाडण्यात आली. पहिल्या तुळईपासून अवघ्या २.८ मीटरवर दुसरी तुळई स्थापन करणे थोडेसे जोखमीचे होते, परंतु या प्रकल्पावर काम करणारे अधिकारी, अभियंते आणि कर्मचारी आणि कामगारांनी अतिशय कुशलतेने ही मोहीम पूर्ण केली. मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू दरम्यान स्थापन करण्यात आलेल्या दोन्ही तुळईंवर पुढील टप्प्यात सिमेंट क्राँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या तुळईला गंज चढू नये यासाठी सी-५ या जपानी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.