वायुप्रदुषणामुळे लाहोरमधील सार्वजनिक ठिकाणी प्रतिबंध

लाहोर – पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील लाहोरमध्ये हवेची गुणवत्ता धोकादायक स्थिती आल्यामुळे येथील बगीचे, मैदाने, प्राणीसंग्रहालये, पर्यटन व ऐतिहासिक स्थळी नागरिकांच्या प्रवेशावर प्रतिबंध करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे अधिक प्रदूषण होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात आली आहे.भारतातील पंजाबमध्ये कापणी नंतर शेत जाळण्याची पद्धत आहे. त्यामुळेही या प्रदूषणात भर पडली आहे. काही दिवसांपूर्वी लाहोरमधील शाळा बंद करण्यात आल्या होत्या. पुढील आठवड्यात शहरातील महाविद्यालयेही बंद करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रवासासाठी होणारा वाहनांचा वापर कमी होऊन प्रदूषण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी आस्थापनांमधील निम्म्या कर्मचारीवर्गाला घरुन काम करण्याचे आदेश देण्यात आले असून काही भागांमध्ये रिक्षांच्या वाहतूकीवर बंदी घालण्यात आली आहे. लाहोरच्या हवामान विभागाकडे हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रेही कमी आहेत. सध्या त्यांच्याकडे केवळ ४ यंत्रे असून वास्तविक आवश्यकता ५० यंत्रांची आहे. पाकिस्तान सरकार या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उपग्रह व कृत्रिम बुद्धीमत्तेची मदत घेणार आहे.