विधान परिषद निवडणुकीत मविआला धक्का काँग्रेसची मते फुटली! जयंत पाटील पराभूत

मुंबई – विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज झालेल्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व म्हणजे 9 उमेदवार निवडून आले. त्यामुळे महाविकास आघाडीला एकदा धक्का बसला. अजित पवार आणि शिंदे गटाचे काही आमदार स्वगृही जाण्याच्या तयारीत असून, ते या निवडणुकीत रंग दाखवतील हा दावा फोल ठरला. उलट काँग्रेसचेच 5 आमदार फुटले. त्यामुळे महायुतीचे सर्व उमेेदवार विजयी झाले. तर उबाठा गटाचे मिलिंद नार्वेकर दुसर्‍या फेरीत निवडून आले आणि शरद पवार पुरस्कृत शेकापचे जयंत पाटील पराभूत झाले. त्यामुळे जयंत पटील यांना बळीचा बकरा बनवला आहे, हा आरोप खरा ठरला.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी एकूण 12 उमेदवार उभे होते. त्यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत मते फुटण्याची शक्यता आधीच बोलून दाखवली जात होती. आज संध्याकाळी निवडणुकीचा निकाल लागला. तेव्हा ती खरी ठरली. याचा फटका महाविकास आघाडीला बसला.
या निवडणुकीत भाजपाचे पंकजा मुंडे यांना 26, परिणय फुके 26, अमित गोरखेंना 26, योगेश टिळेकर 26 मते मिळाली तर भाजपाकडे आवश्यक मते नसतानाही मित्र पक्षाचे नेते सदा खोत यांना भाजपाने उमेदवारी दिली होती. भाजपाने सदा खोत यांचाही विजय खेचून आणला. ते दुसर्‍या पसंतीच्या मतांवर विजयी झाले. शिंदे गटाच्या भावना गवळी 24, कृपाल तुमाने 25 मतांनी विजयी झाले. तर अजित पवार गटाचे राजेश विटेकर 23 आणि शिवाजीराव गर्जे 24 मतांनी विजयी झाले. काँग्रेसच्या प्रज्ञा सावंत पहिल्याच पसंतीच्या 25 मतांवर विजयी झाल्या. पण त्यानंतर मात्र अकराव्या जागेसाठी जोरदार चुरस होती. उबाठाच्या मिलिंद नार्वेकरांना पहिल्या पसंतीची 22 मते मिळाली होती. त्यामुळे त्यांना दुसर्‍या फेरीपर्यंत थांबावे लागले आणि अखेर दुसर्‍या पसंतीच्या मतांवर ते विजयी झाले. तर शरद पवार गटाने पाठिंबा दिलेले शेकापचे जयंत पाटील यांना 12 मते मिळाली आणि त्यांचा पराभव झाला.
निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही या निवडणुकीचे व्यवस्थित नियोजन केले होते म्हणून आमचे सर्व उमेदवार निवडून आले. तर कुणाला किती मते द्यायची, कुणाला पाडायचे यातच महाविकास आघाडीची बिघाडी झाली.
यावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी क्रॉस वोटींग झाल्याचे कबुल करून ज्याने कुणी विश्‍वासघात केला त्यांना असा धडा शिकविणार की पुन्हा कुणाला असे धाडस करण्याची हिम्मत होणार नाही, असे सांगितले. तर देवेंद्र फडणवीस म्हणाले आम्ही 9 उमेदवार उभे केले तेव्हा आमचे उमेदवार पडतील असे सांगितले जात होते. पण आम्हाला आमची मते तर मिळालीच पण मविआची मतेही आम्हाला मिळाली आणि आमचे सर्व उमेदवार निवडून आले.
आज संध्याकाळी चार वाजता मतदान संपेपर्यंत सर्व 274 मतदारांनी मतदान केले. आज मतदानाच्या वेळी विधानसभा परिसरात कट्टर विरोधक असलेल्या वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांच्या गळाभेटी घेतल्या. तसेच कुजबूज चर्चाही केली. त्यामुळेदेखील निवडणुकीत रंगत निर्माण झाली.
आज सकाळी 9 वाजता निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. सगळ्यात आधी भाजपाच्या आमदारांनी मतदान केले. त्यानंतर काँग्रेसचे आमदार मतदानासाठी आले. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार यांच्या आमदारांनी मतदान केले. शिंदे गटाचे आमदार पावसामुळे ट्रॅफिक जाम झाल्याने कोस्टल रोडच्या बोगद्यात अडकले होते. त्यांना मतदानासाठी यायला उशीर झाला. शेवटच्या तासात बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी मतदान केले. तर मनसेचे राजू पाटील यांनी सगळ्यात शेवटी मतदान केले. सगळ्या पक्षांचे आमदार गटागटाने मतदान करण्यासाठी आले होते. मतदानाच्या वेळी आमदारांमध्ये खेळीमेळीचे वातावरण होते. ते एकमेकांची थट्टा मस्करी करत होते.
नवाब मलिकांचे अजित पवारांना मतदान
नवाब मलिक हे अजित पवारांना भेटून मतदान करायला गेले आणि त्यानंतर पुन्हा अजित पवारांच्या कार्यालयात गेले. यावरून ते अजित पवार गटात आहेत हे स्पष्ट
झाले आहे.
पंकजा मुंडे सिद्धिविनायक चरणी
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर निदान विधानपरिषद निवडणुकीत यश मिळू दे अशी प्रार्थना करण्यासाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे आज मतदानापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचल्या.
अजित पवार सतर्क
अजित पवार राष्ट्रवादी गटाने सर्वात आधी मतदान केले. प्रत्येक आमदार अजित पवारांच्या कार्यालयात गेले, तिथून कर्मचारी त्यांना मतदानासाठी घेऊन गेला आणि परत कार्यालयात आणले. तिथे मतदानाची चिठ्ठी अजित पवार ताब्यात घेत होते.
नार्वेकरांचे प्रयत्न
विधानभवन परिसरात उबाठाचे उमेदवार मिलिंद नार्वेकरांनी चंद्रकांत पाटील, बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, प्रसाद लाड अशा अनेक आमदारांची भेट घेऊन पाठिंब्याची विनंती केली. पंकजा मुंडे यांच्याशी त्यांनी 20 मिनिटे चर्चा केली.
गोरंट्याल वक्तव्याचा फायदा
काँग्रेसचे कैलास गोरंट्याल म्हणाले की, काँग्रेसच्या तीन ते चार आमदारांची मते फुटणार असे मी म्हणालो त्याचा आम्हाला फायदा झाला. कारण त्यातील काही आमदार काल बैठकीला आले.
शहाजी बापू व सुर्वे आजारी असून मतदान
शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आजारी असतानाही मतदान करून गेले. आमदार प्रकाश सुर्वे यांचा पाय फ्रॅक्चर झाला असताना व्हिलचेअरमध्ये बसून ते
मतदानाला आले.
राज ठाकरेंच्या फोननंतर
मनसेच्या राजू पाटलांचे मतदान

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील मतदानासाठी आले. परंतु बराच वेळ त्यांनी मतदानच केले नव्हते. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी बोलूनच ते मतदान करणार होते. परंतु अमेरिकेत गेलेल्या राज ठाकरे यांच्याशी त्यांचा संपर्कच होत नव्हता. अखेर मतदान संपायला एक तास शिल्लक असताना त्यांना राज ठाकरेंचा फोन आला. त्यानंतर त्यांनी मतदान केले. त्याआधी राज ठाकरे यांनी देवेद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केल्याचे सांगितले जाते.
झिशान सिद्दीकींचे
कुणाला मतदान?

काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांना काल झालेल्या काँग्रेसच्या बैठकीला आमंत्रण नव्हते. त्यामुळे ते बैठकीला उपस्थित नव्हते. मात्र, आज ते मतदानाला आले आणि काँग्रेसच्या पक्ष कार्यालयातही गेले. मी काँग्रेसचा सदस्य आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच आपण त्यांनी पक्षाने सांगितल्याप्रमाणे काँग्रेस उमेदवारालाच मतदान
केल्याचे सांगितले.
नार्वेकर सर्वपक्षीय आमदार
प्रताप सरनाईकांचे वक्तव्य

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे कुठल्या एका पक्षाचे उमेदवार नाहीत, तर ते सर्वपक्षीय उमेदवार असल्याचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

अजित पवारांना पूर्ण यश
तटकरेंना आनंद आवरेना
अजित पवार गटाचे राजेश विटेकर (23 मते) आणि शिवाजीराव गर्जे (24 मते) मिळवून विजयी झाले. हा निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष सुनील तटकरे यांचा आनंद गगनात मावेना. अजित पवार गटाची मते फुटतील, अशी भीती होती, पण आमदार अजित पवारांच्या पाठीशी राहिले. यामुळे तटकरे आनंदून गेले होते. महाराष्ट्राचा एकच दादा, अजित दादा, अजित दादा अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अजित पवार गटाला त्यांच्या 42 मतांपेक्षा पाच मते अधिक मिळाली.

गायकवाडांना मतदान करू देऊ नका
भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड (शिंदे गटावर) गोळीबार केला होता. त्यामुळे ते मतदान करू शकत नाहीत तर त्यांना मतदान करू देऊ नका असे काँग्रेसने निवडणूक अधिकार्यांना पत्र दिले. पोलीस त्यांना तळोजा कारागृहातून मतदानासाठी घेऊन आले. तिथे ते न्यायालयीन कोठडीत होते. त्यांना न्यायालयाने मतदानाला परवानगी दिली. मात्र अनिल देशमुख आणि नवाब मलिक कारागृहात होते तेव्हा न्यायालयाने त्यांना मतदानाची परवानगी दिली नव्हती. राज्य निवडणूक आयोगाने हा आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाला कळवला. त्यांनी गायकवाड यांना मतदानाची परवानगी दिल्यावर गायकवाड यांनी मतदान केले.

चंद्रकांत पाटील-राऊत
दोघांची दिलखुलास भेट

नेते एक बोलतात आणि नंतर दुसरेच करतात याचा अनुभव अनेकदा आला आहे. आज विधान भवनात भाजपाचे चंद्रकांत पाटील आणि उबाठाचे संजय राऊत हे अगदी दिलखुलास हसत एकमेकांना भेटले. संजय राऊत यांनी आपण पुन्हा एकत्र आले पाहिजे असे म्हटले. मात्र या भेटी सामान्य आहेत. जनतेपुढे आपली दुश्मनी दाखवायची आणि मग एकच ताट वाटून साफ करायचे ही राजकारण्यांची पद्धत नवी नाही.

बविआची भाजपाला साथ
बविआचे हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर आणि राजेश पाटील हे तिन्ही आमदार भाजपा कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी भाजपाला उघड पाठिंबा देत महायुतीच्या उमेदवारांना मतदान केले.

भाजपाचा एक अधिक उमेदवार विजयी
या निवडणुकीत पहिला निकाल भाजपाचे योगेश टिळेकर यांच्या विजयाने लागला. योगेश टिळेकर काही काळ राजकारणापासून दूर होते, पण भाजपाने त्यांना संधी दिली. आज ते विजयी झाल्यानंतर त्यांचा मुलगा भावूक झाला. भाजपाच्या पंकजा मुंडे यादेखील विजयी झाल्याने त्यांचेही पुनर्वसन झाले. परिणय फुके आणि अमित गोरखेही विजयी झाले. त्यामुळे भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले. भाजपाच्या मतांनुसार चारच उमेदवार विजयी होणार होते. पण भाजपाने मित्रपक्षाचे सदा खोत यांना पाचवा उमेदवार म्हणून उभे केले आणि त्यांना निवडून आणले.