काराकास- दक्षिण अमेरिका खंडातील रिपब्लिक ऑफ व्हेनेझुएला या देशात यावेळी सत्तांतर होईल अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तविली होती. मात्र ती साफ चुकीची ठरवित राष्ट्राध्यक्षपदी पुन्हा एकदा निकोलस मादुरो निवडून आले आहेत.
मादुरो यांना ५१ टक्के, तर विरोधी पक्षांचे उमेदवार एडमंडो गोन्झालेझ यांना ४४ टक्के मते मिळाली. देशाच्या निवडणूक आयोगाने आज ही घोषणा केली. या निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष मादुरो यांच्या विरोधात एकवटले होते. त्यामुळे व्हेनेझुएलामध्ये सत्तांतर होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.मादुरो यांनी सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे.
व्हेनेझुएला हे एक प्रजासत्ताक संघराज्य आहे. १९६१ पासून देशाच्या संविधानानुसार दर पाच वर्षांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणूक होते. विद्यमान राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी गेली अकरा वर्षे या देशावर सत्ता अबाधित राखली आहे.मात्र यावेळी त्यांच्यासमोर विरोधकांच्या एकजुटीमुळे खडतर आव्हान होते. ६१ वर्षीय मादुरो यांनी ते आव्हान लिलया पेलले. व्हेनेझुएला या देशाला गेल्या दशकभरापासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. व्हेन्झुएलातील आर्थिक संकटामुळे देशातील तब्बल ७० लाख लोकांनी अन्य देशांमध्ये स्थलांतर केले आहे,असा विरोधकांचा आरोप आहे.