शिंदे गटाचे एकमेव केंद्रिय मंत्री बुलडाण्याचे प्रताप जाधव

बुलडाणा- बुलडाणा लोकसभा मतदार संघातून सतत चार वेळा निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रताप जाधव यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे. सरपंच पदापासून सुरु झालेली त्यांची कारकिर्द आता केंद्रीय मंत्रीपदापर्यंत आलेली आहे.
प्रताप जाधव यांनी बुलडाण्यात सरपंच पदापासून आपली कारकिर्द सुरु केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे ते महत्त्वाचे कार्यकर्ते होते. त्यानंतर १९९५ साली ते शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले. जाधव सलग १५ वर्ष आमदार म्हणून निवडून आले. मनोहर जोशी व नारायण राणे यांच्या मंत्रीमंडळात त्यांनी जलसिंचन व क्रिडा व युवक कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून कार्य केले. २००९ साली शिवसेनेने त्यांना लोकसभेच्या निवडणूकीत उतरवले. त्यानंतर ते सलग चार वेळा बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. बुलडाण्यातील अनेक महत्त्वाच्या संस्थांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले असून सारंगधर साखर कारखान्याच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रताप जाधव हे शिंदेबरोबर आले. त्यानंतरही त्यांनी विजय मिळवला. शिवसेना शिंदे गटातून त्यांना एकट्यालाच मंत्रीपद मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना मंत्रीपदाची अपेक्षा व्यक्त केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top