शिंदे-पवार गटाचे उमेदवार कमळ चिन्हावर लढणार?

मुंबई- भाजपाने लोकसभा निवडणुकीत 370 सीट पार करण्याची जिद्द यावेळी ठेवली आहे. हे घडले तर भाजपाला विरोधक राहणार नाहीत. त्यासाठी महाराष्ट्रात मित्र पक्ष असलेल्या पक्षाच्या आमदारांकडून लोकसभा निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढविण्यासाठी दबाव आणला जात आहे. भाजपा अध्यक्ष नड्डा यांनी मुंबई दौऱ्यात हा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे.
जे. पी. नड्डा दोन दिवसांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तासभर भेट घेतली होती. यावेळी महाराष्ट्रातून जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी नड्डा यांनी शिंदे-अजित पवार गटाला प्रस्ताव दिला की, ज्या मतदारसंघात संभ्रम असेल, त्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांनी भाजपाच्या कमळाच्या चिन्हावर लढावे. त्यामुळे महायुतीला फटका बसणार नाही आणि हे उमेदवार जिंकण्याची चांगली संधी असेल. मात्र, शिंदे आणि पवार यांनी अद्याप याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आणखी व्यापक चर्चेनंतरच याबाबत काही निर्णय होऊ शकेल, असे दोघांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी जे. पी. नड्डा मुंबईत आले होते. त्यांनी अजित पवार गट आणि शिंदे गटापुढे प्रस्ताव ठेवला की तुमचे उमेदवार कमळ चिन्हावर लढतील. (शिंदे गटाला) धनुष्यबाण आणि (अजित पवार गटाला) घड्याळ जरी मिळाले असले तरीही तुम्हाला लोक मतदान करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही कमळावरच लढा, कमळाबाईच्या पदराखाली लपा आणि निवडणूक लढा . ही त्यांची अवस्था आहे . हे जर खोटे असेल तर त्यांनी समोर येऊन सांगावे.
शिंदे-अजित पवार गटाने निवडणूक आयोगाच्या मदतीने चिन्हे चोरली आहेत, मात्र त्या चिन्हांवर निवडणूक लढण्याची त्यांची हिंमत नाही. भाजपाही फुटलेल्या दोन गटांना त्यांच्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवण्याचे धाडस नाही. महाराष्ट्रात उबाठा गट मशाल चिन्हावर लढेल. शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुतारी घेऊन लढेल. काँग्रेस पक्षाचा हात सोबत आहेच. त्यामुळे भविष्यातील लढाई रोमांचकारी होईल, असेही संजय राऊत म्हणाले.
दक्षिण मुंबईत भाजपाकडून
राहुल नार्वेकर उमेदवार?

आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाकडे भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात सध्या विधानसभा अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर निवडणूक लढण्याची जोरदार शक्यता आहे. राहुल नार्वेकर यांनी या मतदारसंघात आज आदित्य ठाकरे आमदार असलेल्या वरळी मतदारसंघाचा दौराही केला. सध्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. दक्षिण मुंबई मतदारसंघात माझगाव, शिवडी, लालबाग परळ या ठिकाणी मनसेची काही प्रमाणात ताकद आहे. तिचा फायदा भाजपाला होऊ शकतो, असे गणित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top