श्रावणानिमित्त महामंडळाचा एसटी संगे तीर्थाटन उपक्रम

मुंबई – श्रावणमासाला उद्यापासून सुरुवात होत असून या महिन्यात अनेक जण विविध तीर्थक्षेत्री दर्शनासाठी जात असतात. त्यांच्यासाठी एसटी संगे तीर्थाटन या उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत लोकांना माफक दरात तीर्थाटनाला जाता येणार आहे.

एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात या एकदिवसीय किंवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यांना विविध प्रकारच्या सवलती देण्यात येणार आहेत. यामध्ये एसटीच्या नेहमीच्या सवलतीही मिळणार आहेत. त्यात ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत तर ज्येष्ठ नागरिक व महिलांना एसटी भाड्यात नेहमीप्रमाणेच पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे. पावसाळ्यात एसटीचे उत्पन्न वाढीसाठी पावसाळी पाससारखी योजना असते त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील अनेकांची श्रावणातील तीर्थाटनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.