श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा निमंत्रणाचे वाटप सुरू

अयोध्या – अयोध्येतील श्रीरामाच्या भव्य मंदिराचे निर्माण कार्य वेगाने पूर्ण होत आहे. 22 जानेवारी 2024 या शुभमुहूर्तावर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका वाटपाचे काम सुरू झाले आहे.
हा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. देशभरातील चार हजारहून अधिक संत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने या संतांना विशेष आमंत्रण पत्र पाठवण्यात
येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा आणि पहिली आरती करतील. 22 जानेवारीला मृगषिरा नक्षत्रात दुपारी 12.20 वाजताच्या मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. निमंत्रण पत्रात लिहिले आहे की, ‘दीर्घ संघर्षानंतर श्रीराम जन्मभूमीवर मंदिर निर्माण कार्य प्रगतीपथावर आहे. पौष, शुक्ल द्वादशी, विक्रम संवत 2080, सोमवार, 22 जानेवारी 2024 रोजी गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. या प्रसंगी तुम्ही अयोध्येत उपस्थित राहून प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार व्हा आणि या महान ऐतिहासिक दिवसाची प्रतिष्ठा वाढवा.’
पत्रात पुढे असेही लिहिले आहे की 21 जानेवारीच्या आधी अयोध्येत येण्याची योजना बनवा. जितके लवकर याल, तितके तुमच्या सोयीचे होईल. विलंबाने आल्यावर तुमची गैरसोय होऊ शकते. 23 जानेवारी 2024 नंतरच अयोध्येतून परतण्याची
योजना बनवा. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह देशभरातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, विशेष पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अयोध्येत उपस्थित साधुसंत श्रीरामाचे दर्शन घेतील. त्यांना 23 जानेवारीला रामलल्लाचा प्रसाद म्हणून भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top