संभाजीनगरात कपड्याच्या दुकानाला आग! ७ ठार

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधील छावणी परिसरातील दाना बाजार गल्लीतील महावीर जैन मंदिरच्या बाजूला असलेल्या इमारतीतील एका कपड्याच्या दुकानाला आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये २ लहान मुलांचा देखील समावेश आहे.

जैन मंदिराच्या शेजारी असणाऱ्या इमारतीच्या तळ मजल्यावर कपड्यांचे दुकान आहे. या दुकानात आज पहाटे भीषण आग लागली. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारे कुटूंब गाढ झोपेत होते. त्यामुळे त्यांना घरा बाहेर जाण्याची संधी मिळाली नाही. आगाीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे गुदमरून कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीचे कारण स्पष्ट झाले नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आग लागलेल्या इमारतीत एकूण १६ लोक होते. पहिल्या मजल्यावर ७ लोक होते. तर दुसऱ्या मजल्यावर ७ लोक होते आणि तिसऱ्या मजल्यावर २ लोक होते. पहिल्या मजल्यावर लोकांना घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. इतर मजल्यावरील लोक लगेचच घराबाहेर पडले. या आगीत काही जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top