सर्व्हे निगेटिव्ह आहे सांगून भाजपा आमचे मतदारसंघ घेत आहे! शिंदे गटाचा आरोप

मुंबई – लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची तारीख जवळ येऊनही जागावाटपावरून महायुतीत सुरू असलेला तणाव संपण्याऐवजी वाढत चालला आहे. खासकरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांच्यात यावरून जोरदार धुसफूस सुरू आहे. भाजपा मतदारसंघ आणि दिलेले उमेदवार बदलण्यासाठी शिवसेनेवर दबाव टाकत असल्याची चर्चा असतानाच माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेत्याने भाजपावर थेट आरोप केला आहे की, भाजपा अंतर्गत सर्व्हे आणि केंद्रीय हेरखात्याच्या अहवालाच्या नावाखाली शिंदेंची फसवणूक करत असून, मित्रपक्षालाच संपवण्याची रणनीती वापरत आहे.
महायुतीतील वादामुळे महायुतीचे सर्व उमेदवार अजूनही जाहीर झालेले नाहीत. या उर्वरित जागांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. तरीही जागावाटपावरून दोन्ही पक्षांतील वाद शिगेला पोहोचला असताना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री सुरेश नवले यांनी आज भाजपावर जोरदार टीका केली. ‘नवाकाळ’शी बोलताना ते म्हणाले की, भाजपा अंतर्गत सर्व्हेच्या नावाखाली शिंदेंना फसवत आहे. भाजपाला जे नको आहेत, ते लोक बदलले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह आहे. त्यासाठी वारंवार
सर्व्हेची कारणे दिली जात आहेत. आयबीचा रिपोर्ट विरोधात आहे, असेही सांगितले जात आहे. ही रणनीती चुकीची आहे. शिवसेनेचे जे विद्यमान खासदार लोकसभेची निवडणूक लढू इच्छितात, त्यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे, ही माझ्यासारख्या असंख्य शिवसैनिकांची भावना आहे. भाजपा काही विशिष्ट मतदारसंघात हस्तक्षेप करून त्यांना उमेदवारी देऊ नका, असा आग्रह धरत आहे. शिवसेनेची उमेदवारी कोणास द्यायची, हा अधिकार पूर्णतः शिवसेनेचा आहे. माननीय मुख्यमंत्री याबाबतीत निर्णय घेतील. परंतु मित्रपक्षाचे खच्चीकरण करणे, हे जे भाजपाचे मूळ धोरण आहे, त्याबद्दल शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे. तो प्रसंगी प्रतिक्रियेच्या रूपाने उमटू शकतो, याची गांभीर्याने भाजपाने नोंद घेतली पाहिजे. हा माझ्यासारख्यांचा आग्रह आहे. शत्रूपक्षाचे नंतर पाहू, अगोदर मित्रपक्षाचा निपटारा करू. हा भाजपाचा धोरणात्मक पवित्रा अनिष्ट आहे, असे माझे
मत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सौम्य प्रकृतीचे आहेत. परंतु, ते ठाम आहेत, हा विश्वास आम्हाला आहे. भाजपा मित्रपक्षांना संपवत आहे. भाजपा सर्व्हेच्या नावाखाली एकनाथ शिंदेंना फसवण्याचे काम करत आहेत. परंतु, शिंदे भाजपासमोर झुकणार नाहीत. ते भाजपाच्या एकूण षड्यंत्राला बळी पडणार नाहीत. ये बंद कराने आये थे तवायफों के कोठे…मगर सिक्कों की खनक देखकर खुद ही नाच बैठे, अशी भाजपाची अवस्था आहे. त्यांनी यातून बाहेर पडावे, अशी आमची मागणी असल्याचेही नवले म्हणाले.
लोकसभेची एकेक जागा महत्त्वाची असल्याने महायुतीत जबर रस्सीखेच सुरू आहे. आतापर्यंत महायुतीच्या 40 जागांवरील उमेदवार जाहीर झाले आहेत. यात भाजपाने सर्वाधिक 25, शिंदेंच्या शिवसेनेने 9, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 6 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि मुंबईतील काही जागांवरून चुरस आहे. भाजपाने शिवसेनेच्या वाट्याच्या काही जागा मागितल्याने शिवसेनेचे विद्यमान खासदार नाराज आहेत.
स्वतःचे राजकीय अस्तित्व पणाला लावून शिंदे आणि पर्यायाने भाजपाबरोबर आलो, असे असताना भाजपा त्यांनाच उमेदवारी देण्यास विरोध करत असल्याने ते संतापले आहेत. नवले यांनी ही नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याने महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top