ससूनच्या डॉक्टरने पोर्श आरोपीला वाचवायला रक्त बदलले! लोकसेवकाने फोन केला

पुणे- पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आणखी संतापजनक माहिती आज उघड झाली. पोर्श चालविणाऱ्या अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी त्याच्या वडिलांनी डॉक्टरांना लाच दिली आणि लोकसेवकाने फोन करून आरोपीचे चाचणीसाठी घेतलेले रक्त बदलले. इतकेच नाही तर मूळ रक्ताची बाटली कचऱ्यात फेकली. ससून रूग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ.अजय तावरे याने आरोपीच्या रक्ताचा नमुना बदलला. या कामात त्याला मुख्य वैद्यकीय अधिकारी (सीएमओ) डॉ. श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे याने मदत केली. त्यानंतर दोन लाचखोर डॉक्टर आणि शिपायाला पोलिसांनी अटक केली आणि 30 मे पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. दरम्यान रक्त बदलण्यासाठी आरोपींनी लाच म्हणून घेतलेले 3 लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.
अपघात झाला त्या रात्री अल्पवयीन आरोपीचा पिता विशाल अग्रवाल याने मुलाचे रक्त तपासणीसाठी ज्या विभागात पाठविण्यात आले होते त्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. तावरे याला फोन करून आरोपीचा रक्ताचा नमुना बदलण्यास सांगितले. कारण अल्पवयीन आरोपी मद्य प्यायला होता, हे विशाल अग्रवाल याला माहिती होते. त्यामुळे त्याच्या रक्तात दारूचा अंश सापडू नये म्हणून त्याने रक्ताचा नमुना बदलायला सांगितले. एका लोकसेवकानेही यासाठी फोन केला. त्यानुसार डॉ. तावरे याने रुग्णालयाचे प्रमुख अधिकारी डॉ.हळनोर याला अरोपीच्या रक्ताचा नमुना बदलण्यास सांगितले. तावरेच्या सांगण्यावरून डॉ. हळनोरने शिपाई घटकांबळेच्या मदतीने रक्ताचा नमुना कचऱ्याच्या पेटीत फेकून दिला आणि दुसऱ्याच कोणाचा तरी रक्ताचा नमुना फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे चाचणीसाठी पोचवला. हे रक्त त्याने कोणा रुग्णाच्या शरीरातून काढून घेतले की रुग्णालयाच्या रक्तपेढीतील रक्ताचा नमुना घेतला याचा तपास करण्यात येत आहे. रुग्णालयातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले आहे. विशाल अग्रवाल आणि तावरे यांच्या फोन कॉल्सचा तपशीलही आमच्या हाती आला आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
डॉ. तावरें नेहमीच वादात
डॉ. तावरे हा याआधी अनेक प्रकरणांमध्ये अडकला होता. किडनी तस्करी प्रकरणात तो संशयित होता. ससून रुग्णालयात एका रुग्णाचा उंदीर चावल्याने मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात हलगर्जीपणाचा आरोप ठेवून तावरेला निलंबित करण्यात आले होते. ड्रग प्रकरणातील पळून गेलेला आरोपी ललित पाटील प्रकरणातही त्याच्यावर आरोप झाले होते. मात्र तावरेचे अनेक राजकीय नेत्यांशी घनिष्ठ संबंध असल्याने त्याला पुन्हा सेवेत दाखल करून घेण्यात आले. गेली पंधरा वर्षे ससूनमधून त्याची बदली झालेली नाही.तावरेवर राष्ट्रवादीचे कोल्हापूरचे नेते हसन मुश्रीफ आणि पुण्याचा राष्ट्रवादीचा आमदार टिंगरे यांचा वरदहस्त आहे, असा आरोप काँग्रेसचे धंगेकर यांनी आज केला. हसन मुश्रीफ यांनी मात्र आरोप फेटाळत धंगेकर यांना 24 तासात आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सवाल केला की, अजित पवार यांनी आयुक्तांना फोन केला याचा खुलासा आयुक्तांनी करावा. प्रत्येक विषयावर बोलणारे अजित पवार गेले चार दिवस या प्रकरणावर बोलले का नाहीत ?
त्या रात्री अनेकांनी ईमान विकले – धंगेकर
फक्त ससूनमधील अटक करण्यात आलेले दोन डॉक्टरच नव्हे तर त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले, अशी प्रतिक्रिया पोर्श अपघात प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक केल्यानंतर धंगेकर यांनी दिली.हळूहळू सर्व सत्य बाहेर येईल, असा इशारा धंगेकर यांनी दिला. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीम यांच्या आशीर्वादानेच हा सारा काळाबाजार ससून रुग्णालयात बऱ्याच काळापासून सुरू होता, असा थेट आरोप धंगेकर यांनी एक्सवरील पोस्टमधून केला.
पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाच्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. तुम्हा-आम्हाला काही तासांत मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये 7 दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता. याच अपघातात मरण पावलेल्या अश्विनी कोस्टांच्या नातेवाईकांनी अजून अर्धा तास मृतदेह शवागारात ठेवा, अशी विनंती केली होती. मात्र याच ससून रुग्णालयाने अर्धा तास वाढवून देण्यास नकार दिला होता. हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले. ते आता हळूहळू जगासमोर येईल, असे धंगेकरांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या
कार्यालयावर धडक मोर्चा

पोर्श अपघातामुळे पुण्यातील वाढत्या पब संस्कृतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे . पुण्यात काँग्रसचे आमदार रवींद्र धंगेकर, मोहन जोशी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर आज धडक मोर्चा काढण्यात आला.निदर्शन करणारे पुठ्ठ्याचे मोठे खोके घेऊन आले होते. त्यावर गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्यासह काही नेत्यांचे फोटो आणि त्यावर 50 खोके असे लिहिलेले होते. उत्पादन शुल्क कार्यालयात शिरून धंगेकर, जोशी आणि अंधारे यांनी अधिकाऱ्यांना अक्षरशः धारेवर धरले. पोलीस अधिकारी पब-बार मालकांकडून दर महिन्याला 70 ते 80 लाख रुपये हफ्ता वसूल करतात असा आरोप या नेत्यांनी केला. कोण कोणत्या बारकडून महिन्याला किती हफ्ता दिला जातो याची यादीच सुषमा अंधारे यांनी वाचून दाखविली. पुण्यातील अनेक बार आणि पब मालकांकडे रितसर परवाना नाही असे असताना हे बार पहाटे चार वाजेपर्यंत सुरू असतात. त्यांच्यावर काय कारवाई केली,असा जाब उत्पादन शुल्क विभागाचे पुणे जिल्हा प्रमुखांना विचारला. पुण्याची अवस्था उडता पंजाबसारखी झाली आहे,अशी जळजळीत टीका सुषमा अंधारे यांनी केली. पुण्यातील वाढती पब संस्कृती पूर्णपणे नष्ट केली जात नाही तोपर्यंत शांत राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top